जगभरातील अनेक देश, राज्यं आणि शहरं वेगवेगळ्या समस्यांचा सामना करत असतात. नागरिकांना कधी नैसर्गिक आपत्यांचा सामना करावा लागतो, तर कधी मानवनिर्मित संकटांशी दोन हात करावे लागतात. संकटाच्या काळात शासकीय अधिकाऱ्यांना सर्वात पुढे उभं राहून सेनापतीप्रमाणे लढावं लागतं. असंच एक संकट दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलवर आलं आहे. सेऊलमध्ये ढेकणांचा उच्छाद वाढला आहे. परिणामी नागरिकांच्या उद्रेकामुळे इथल्या सेऊलमधल्या अधिकाऱ्यांना चक्क ढेकणांशी दोन हात करावे लागत आहेत.

दक्षिण कोरियाच्या सेऊल, बुसान आणि इंचॉन शहरांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ढेकणांचे १७ उद्रेक झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केली आहे. सेऊल प्रशासनाने ढेकणांशी लढण्यासाठी विशेष पथक तयार केलं आहे. तसेच याविरोधात लढण्यासाठी तब्बल ५०० मिलियन वॉन (३.८३ लाख डॉलर्स/ ३ कोटी १९ लाख रुपये) इतका निधी बाजूला काढून ठेवला आहे. याआधी फ्रान्स आणि यूकेमध्येही ढेकणांची समस्या निर्माण झाली होती. तेव्हा तिथल्या काही प्रदेशात ढेकणांची दहशत पसरली होती.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण कोरियातील डेगू शहरातील एका विद्यापीठात सर्वात आधी ढेकणांचा प्रादूर्भाव नोंदवण्यात आला होता. डेगू शहरात सर्वत्र ढेकणं दिसत होती. तेव्हापासून दक्षिण कोरियन नागरिक ढेकणांच्या भीतीने चित्रपटगृहांमध्ये जाणं टाळतात, तसेच सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर करत नाहीत.

ढेकणांनी पुन्हा डोकं वर काढलं

दक्षिण कोरियासाठी ढेकणांची समस्या नवी नाही. यापूर्वी दक्षिण कोरियाने १९६० साली देशव्यापी मोहीम हाती घेऊन ढेकूण नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात तत्कालीन सरकार यशस्वीदेखील झालं होतं. परंतु, या समस्येनं आता पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.

हे ही वाचा >> अन्यथा : ढेकूण फार झालेत..

त्वचेवर जिथे ढेकणाने चावा घेतला असेल तिथे प्रचंड खाज सुटते. त्याजागी खाजवल्याने जखमादेखील होतात. तसेच त्या जखमांचे डाग लवकर जात नाहीत. ढेकूण चावल्यामुळे सेऊलमधले नागरिक दवाखाने आणि रुग्णालयांत जात आहे. तसेच वेगवेगळ्या तपासण्या करून घेत आहेत. त्याचबरोबर सरकारने यावर उपाययोजना राबवण्याची मागणी करत आहेत.

हे ही वाचा >> “आम्ही नेहमीच सनातन धर्माचा…”, उदयनिधींचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला देत म्हणाले…

सरकारने बोलावली तातडीची बैठक

सेऊल प्रशासन आता सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, हॉटेलांची स्वच्छता यावर भर देत आहे. ढेकणांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी काय-काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा करण्यासाठी सेऊल सरकारने तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे. ढेकणांचा उच्छाद रोखण्यासाठी सेऊलमध्ये वेगवेगळ्या कीटकनाशकांचा वापर केला जात आहे. परंतु. यापैकी अनेक कीटकनाशकं कुचकामी ठरली आहेत. त्यावरून सरकारच्या कारभारावर बोट ठेवलं जात आहे.

Story img Loader