केरळमध्ये गोमांसाचे सेवन यापुढेही सुरू राहील, असे सांगून पर्यटनमंत्री म्हणून पहिल्याच दिवशी अल्फॉन्स कन्ननथानम यांनी गोमांसाच्या वादग्रस्त मुद्याला सोमवारी स्पर्श केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कन्ननथानम हे सनदी सेवेतून राजकारणात आले आहेत. गोमांस खाता येऊ शकत नाही, असे भाजपने कधीही म्हटले नसल्याचा दावा १९७९च्या केरळ तुकडीचे अधिकारी असलेले कन्ननथानम यांनी पीटीआयशी बोलताना केला. गोव्यात गोमांसाचे सेवन केले जाईल असे म्हणून मनोहर पर्रिकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री या नात्याने सांगितले होते. त्याचप्रमाणे, केरळमध्येही गोमांस खाल्ले जाईल, असे ते म्हणाले.

गोमांस खाता येणार नाही असा आदेश भाजपने कधीही दिला नाही. कुठल्याही भागातील खाण्याच्या सवयींबाबत आम्ही आदेश देऊ शकत नाही. त्याबाबत लोकांनाच ठरवायचे आहे. भाजपचे शासन असलेल्या गोव्यासारख्या राज्यातील लोक गोमांस खात असतील, तर केरळमध्येही त्याबाबत काही अडचण असू नये, असे कन्ननथानम यांनी स्पष्ट केले. आपण ख्रिस्ती समुदाय आणि भाजप यांच्यातील पूल म्हणून काम करू, असे कन्ननथानम यांनी नंतर एका दूरचित्रवाहिनीला सांगितले. ख्रिस्ती समुदायाने पूर्वी भाजपबाबत  जी चिंता व्यक्त केली होती, तो  केवळ प्रचाराचा भाग होता, असे ते म्हणाले.