“मुस्लीम आधी हिंदूच होते, धर्मांतरानंतर ते मुस्लीम झाले”, असं वादग्रस्त वक्तव्य डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी केलं आहे. डोडा जिल्ह्यात एका मेळाव्यात संबोधित करताना ते बोलत होते.
डोडा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या मेळाव्यात गुलाम नबी आझाद म्हणाले की, “आमच्याकडे काश्मीरचे उदाहरण आहे, ६०० वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये एकही मुस्लिम नव्हता, काश्मिरी पंडितांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले होते. केवळ भारतातच नाही तर जगभर मुस्लिम धर्म स्वीकारला गेला. इस्लाम १५०० वर्षे जुना आहे, पण हिंदू धर्म त्याहून जुना आहे.”
गुलाम नबी आझाद म्हणाले, “आम्ही हे राज्य हिंदू, मुस्लिम, दलित, काश्मिरींसाठी बनवले आहे. ही आमची भूमी आहे, इथे बाहेरून कोणी आलेले नाही. मी संसदेत अशा अनेक गोष्टी पाहिल्या आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहचत नाहीत. आमचा एक सहकारी खासदार म्हणाला की येथे काही लोक बाहेरून आले आहेत. पण मी ते नाकारले. आमच्या हिंदुस्थानात इस्लाम अवघ्या १५०० वर्षे जुना आहे. हिंदू धर्म खूप जुना आहे, त्यामुळे त्यातील १०-२० जण बाहेरून आले असावेत.” ते पुढे म्हणाले, ६०० वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये मुस्लिम कोण होता? सर्व काश्मिरी पंडित होते, सर्वांनी इस्लाम स्वीकारला होता. “
तसंच, “बंधुभाव, शांतता आणि एकता ठेवण्याचंही आवाहन गुलाम नबी आझाद यांनी केलं आहे. धर्माला राजकारणाशी जोडलं जाऊ नये. लोकांनी धर्माच्या आधारे मतदान करू नये”, असंही ते म्हणाले.