उत्तर प्रदेशात रंगांचा सण अर्थात रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. अलिगढमधल्या एका मशिदीला सुरक्षेच्या कारणास्तव झाकण्यात आलं आहे. गेल्या पाच वर्षांपासून या कालावधीत ही मशीद झाकली जाते. सुरक्षेच्या कारणास्तव यंदाही या मशिदीला कापडाने झाकण्यात आलं आहे.
या प्रकरणी एका स्थानिक व्यक्तीने सांगितलं की, रंगपंचमीच्या दिवशी या मशिदीवर रंग पडून नये, इमारत खराब होऊ नये यासाठी गेल्या ५ वर्षांपासून प्रशासनातर्फे ही मशीद कापड किंवा ताडपत्रीने झाकली जाते. ही मशीद अलिगढमधील कोतवाली शहरातल्या अब्दुल करीम चौकात आहे. हा चौक संवेदनशील भागांपैकी एक आहे. या चौकातल्या मुख्य बाजारात रंगपंचमी खेळली जाते. गेल्या ५ वर्षांमध्ये रंगपंचमीच्या दिवशी मशिदीवर रंग पडल्याने मोठा गोंधळ झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे खबरदारीसाठी रंगपंचमीच्या सणाच्या कालावधीत मशिदीला कापड आणि ताडपत्रीने झाकले जाते, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही.
प्रादेशिक मुस्लीम समाज आणि मस्जिद समितीतर्फे शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मशिदीला ताडपत्री लावली जाते. होळीच्या पूजेच्या दिवशी पहाटे ही व्यवस्था केली जाते.
मशीद झाकण्याच्या निर्णयाचे स्थानिक मुस्लीम समुदायाने कौतुक केले आहे. प्रत्यक्षात होळीच्या दिवशी दोन समाजात हाणामारी झाल्याने संपूर्ण शहरात अशांततेचे वातावरण आहे. अशा स्थितीत अलीगढ प्रशासनाने मशिदीला पूर्णपणे झाकून टाकले आहे. प्रशासनाच्या या उपक्रमाचे मुस्लीम बांधवांनी स्वागत केले आहे.