लोकसभेच्या २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत बहुमत मिळावे यासाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान या तीन राज्यांमध्ये हरल्यानंतर भाजपाने कंबर कसली असून आपली ताकद दाखविण्यासाठी पक्षाने एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पक्षाची ताकद दाखविण्यासाठी भाजपाने जानेवारीमध्ये शक्तीप्रदर्शनासाठी २ दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम ११ व १२ जानेवारी रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार आहे. निवडणुकीला साधारणपणे तीन महिने बाकी असताना भाजपातर्फे आपल्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सचिव यांसारखे पक्षाचे जवळपास १५ हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली या अधिवेशनाचे नियोजन करण्यात आले आहे. याआधी राष्ट्रीय अधिवेशनाला जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना बोलवले जात नव्हते. यानिमित्ताने भाजपा आपले २०१९ च्या निवडणुकीचे बिगुल वाजवणार आहे असे पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. पक्षातर्फे इतक्या मोठ्या स्तरावरील अधिवेशन याआधी २०१० मध्ये नितीन गडकरी अध्यक्ष असताना इंदौर येथे आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर आता ८ वर्षांनी पक्षाकडून शक्तीप्रदर्शन होणार आहे. यामध्ये पदाधिकाऱ्यांना पक्षाची भूमिका, प्रचार पद्धती यांसारख्या गोष्टींबाबत वरिष्ठांकडून सांगण्यात येईल.