मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलेल्या तीनही प्रयोगशाळात केलेल्या चाचण्यात मॅगी नूडल्स योग्य ठरल्या असून त्यामुळे हे उत्पादन पुन्हा बाजारात आणण्याचा मार्ग सोपा झाला आहे असे नेस्ले इंडिया या मॅगी उत्पादक कंपनीने म्हटले आहे.
शिसे व मोनोसोडियम ग्लुटामेट यांच्या जास्त मात्रेमुळे मॅगीवर बंदी घालण्यात आली आहे. कंपनीने म्हटले आहे की, आमच्या कंपनीने मॅगी नूडल्सचे नव्याने उत्पादन केले असून त्याची तपासणी उच्च न्यायालयाने सांगितलेल्या तीन प्रयोगशाळात झाली त्यात मॅगी खाण्यास योग्य असल्याचे निष्कर्ष आहेत त्यामुळे आता उत्पादन व विक्री सुरू करणार आहोत. मॅगी नूडल्सच्या नमुन्यांचे परीक्षण नवीन उत्पादनाबाबतीत मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलेल्या तीन प्रयोगशाळांत केले असता त्यात शिसे व मोनोसोडियम ग्लुटामेट धोकादायक प्रमाणापेक्षा कमी दिसून आले आहे. कंपनीने म्हटले आहे की, न्यायालयाच्या आदेशांचे पालन केल्यानंतर आम्ही वर्षअखेरीस मॅगीचे उत्पादन व विक्री पुन्हा सुरू करणार आहोत.
मॅगी नूडल्स सुरक्षित आहेत त्यांच्या २० कोटी पाकिटांच्या चाचण्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळात केल्या आहेत व त्यात कुठल्याही रसायनाचे धोकादायक प्रमाण दिसलेले नाही. अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या देशांनीही भारतात उत्पादित केलेले मॅगी सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे.

Story img Loader