अलिकडेच केरळमधील अक्षय लॉटरी पश्चिम बंगालमधून आलेल्या स्थलांतरित बांधकाम कामगाराला लागली होती व त्याचे भाग्य उजळले होते. आता राज्य सरकारची हीच लॉटरी आंध्रमधून नशीब अजमावण्यासाठी केरळात आलेल्या भिकाऱ्याला लागली असून लॉटरीची रक्कम ६५ लाख रुपये आहे. अपंग असलेल्या पस्तीस वर्षे वयाच्या पोनय्या नावाच्या भिकाऱ्याला ही लॉटरी लागली आहे.  हा स्थलांतरित असून तो वेलारडा या उपनगरात राहतो. त्याला लागलेली लॉटरी ही ६५ लाखांची असली, तरी त्याने बुधवारच्या सोडतीत अनेक उत्तेजनार्थ बक्षिसे जिंकली असून ती रक्कम ९० हजार रुपये आहे. पोलिसांनी त्याला लॉटरी लागल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली असता वडील व भाऊ काल येथे आले व त्यांनी पारितोषिक रक्कम मिळण्याची प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्याला घरी नेण्याचे ठरवले आहे. पश्चिम बंगालमधून आलेल्या एका स्थलांतरिताला गेल्या महिन्यात १ कोटींची लॉटरी लागली होती. पोनय्या हा आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्य़ातील आहे.