अनेकदा रस्त्यावर आपल्याला भिकारी भीक मागताना दिसतात. कुणाला अन्न हवं असतं, कुणाला त्या अन्नासाठी पैसे. गुजरातमधल्या एका भिकाऱ्याकडे भीक मागून जमलेले एक लाख रुपये होते. मात्र या भिकाऱ्याचा मृत्यू भुकेने तडफडून झाला. रविवारी वलसाड येथील सरकारी रुग्णालयात या भिकाऱ्याला दाखल करण्यात आलं तेव्हा त्याच्याकडे १ लाख रुपये होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच या भिकाऱ्याचा मृत्यू झाला. या भिकाऱ्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा त्याचा मृत्यू भुकेमुळे झाल्याचं कारण समोर आलं.
१०८ क्रमांक दुकानदाराने डायल करताच पोहचली टीम
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार वलसाडचे अधिकारी या प्रकरणी पुढील चौकशी करत आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार रविवारी एका दुकानदाराने आपत्कालीन क्रमांक १०८ डायल केला आणि गांधी वाचनालयाजवळच्या रस्त्याच्या बाजूला एक भिकारी आहे त्याची प्रकृती खालावली आहे असं सांगितलं. यानंतर भावेश पटेल आणि त्यांची टीम या ठिकाणी पोहचली. त्यांनी या वृद्धाची विचारपूस केली. प्राथमिक तपासणीनंतर या वृद्धाला उपचारांसाठी वलसाड येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांचा मृत्यू झाला.
वृद्धाकडे एकूण किती पैसे होते?
गेल्या काही दिवसांपासून तो वृद्ध माणूस फारशी हालचाल करताना दिसत नव्हता असं दुकानदाराने सांगितलं. तर भावेश पटेल म्हणाले की आम्ही जेव्हा त्या वृद्ध भिकाऱ्याला रुग्णालयात नेलं तेव्हा त्याच्याकडे १ लाख १४ हजार रुपये होते. ५०० रुपयांच्या ३८ नोटा, २०० रुपयांच्या ८३ नोटा, १०० रुपयांच्या ५३७ नोटा आणि २० रुपये तसंच १० रुपयांच्या नोटा आणि नाणी यांचा समावेश होता. या नोटा आणि नाणी त्याने प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून स्वेटरच्या खिशात ठेवल्या होत्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर ही रक्कम वलसाड पोलिसांकडे देण्यात आली.
डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?
वलसाड सरकारी रुग्णालयाचे डॉक्टर कृष्णा पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्धाला रुग्णालयात आणल्यानंतर त्याने चहा मागितला. आम्हाला वाटलं की त्याला भूक लागली आहे आणि रक्तातली पातळी कमी झाली आहे. त्यामुळे आम्ही सलाईन लावून उपचार सुरु केले. मात्र तासाभरानंतर या वृद्धाचा मृत्यू झाला. या वृद्ध माणसाने गेल्या काही दिवसांपासून काहीही खाल्लं नव्हतं असंही डॉक्टरांनी सांगितलं. या भिकाऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही.