इराकमध्ये अमेरिकेकडून सुरू असलेल्या हवाई हल्ल्याला विरोध म्हणून ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरिया’ (आयसिस) या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी स्टीव्हन सॉटलॉफ या आणखी एका अमेरिकी पत्रकाराचा शिरच्छेद केला. सॉटलॉफ हे इस्त्रायलचेही नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दहशतवाद्यांच्या या कृत्याने अमेरिकन जनता हादरणार नाही, तर एक होईल, अशा शब्दांत अध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘इस्लामिक स्टेट’ला सुनावले. दरम्यान, ओलिस ठेवलेल्या ब्रिटनच्या आणखी एका नागरिकाचाही शिरच्छेद करू, असा इशारा दहशतवाद्यांनी दिल्यानंतर ब्रिटन सरकारने नागरिकाच्या सुटकेसाठी खंडणी म्हणून फुटकी कवडीही न देण्याचे स्पष्ट केले.इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी याआधी जेम्स फॉली या अमेरिकी पत्रकाराची क्रूर हत्या करून त्याची ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध केली होती. काही दिवसांपूर्वीच या दहशतवाद्यांनी सॉटलॉफ यांचे अपहरण केले होते. सॉटलॉफ यांना जीवदान मिळावे यासाठी त्यांच्या आईने आयसिसला विनंती केली होती. सॉटलॉफ हे मूळचे मियामीचे असून, टाइम आणि फॉरेन पॉलिसी या नियतकालिकांसाठी ते मुक्त पत्रकार म्हणून काम पाहत होते.
महिलेचे अपहरण
‘आयसिस’ने केलेल्या कृत्याचा अमेरिका, ब्रिटन आणि संयुक्त राष्ट्रांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी परिस्थितीचा विचार करण्यासाठी मंत्रिमंडळाची बठक बुधवारी घेतली. दरम्यान, एका २६ वर्षांच्या महिलेचे अपहरण करण्यात आले आहे.
हत्येने हादरणार नाही
दहशतवाद्यांच्या या कृत्याने अमेरिकन जनता हादरणार नाही, तर एक होईल, अशा शब्दांत अध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘इस्लामिक स्टेट’ला सुनावले.
First published on: 04-09-2014 at 04:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beheading videos wont intimidate us they only unite us barack obama