चीनची राजधानी बीजिंगमध्ये हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन होणार आहे. मात्र त्याच्या दोन आठवड्यांपूर्वीच परिसरातील २० लाखांहून अधिक रहिवाशांची करोना चाचणी करण्यात येईल, असे शहराच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. बीजिंगच्या फेंगताई जिल्ह्यात रविवारी ९ करोनाबाधित आढळले आहेत. रुग्णसंख्या जास्त नसली तरी ज्या शहरांमध्ये कठोरपणे “झिरो-COVID” धोरण राबविले गेले होते. त्या शहरांमध्ये २० पेक्षा जास्त रुग्णसंख्या पोहोचली आहे, त्यामुळे ऑलिम्पिकपूर्वी शहरातील रहिवाशांची करोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बीजिंग सरकारचे प्रवक्ते जू हेजियान म्हणाले की, “येत्या काही दिवसांत फेंगताईच्या सर्व २० लाख रहिवाशांची करोना चाचणी घेतली जाईल. चीनच्या “झिरो-कोविड” या दृष्टिकोनांतर्गत, देशात अजूनही आंतरराष्ट्रीय प्रवासावर कडक निर्बंध पाळले जात आहेत आणि रुग्णसंख्या शून्यावर येईपर्यंत इथे बाधितांच्या सर्व जवळच्या लोकांची मोठ्या प्रमाणावर चाचणी केली जाते आणि त्यांना अलगीकरणात ठेवण्यात येतं.”
या दृष्टिकोनामुळे चीनला मोठी दुसरी लाट टाळण्यास आणि गेल्या वर्षभरात सामान्य रुग्णसंख्या राखण्यास मदत झाली आहे. दरम्यान, बीजिंगमध्ये हिवाळी ऑलिम्पिकचे ४ फेब्रुवारी रोजी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग उद्घाटन करणार आहेत. रशियाचे व्लादिमीर पुतिन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भात वृत्त दिलंय.
बीजिंग सरकारमधील झू म्हणाले, “आपण दृढ, कठोर आणि निर्णायक उपाययोजना करून शक्य तितक्या लवकर करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.”
बीजिंगमध्ये १५ जानेवारीपासून नोंदवलेल्या ४३ रुग्णांपैकी, सहा जण वेगाने प्रसारित होणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे होते, तर उर्वरित डेल्टा होते. ओमायक्रॉनचा शिरकाव हाँगकाँगमध्येही झाल आहे. रविवारी, हाँगकाँगमध्ये १४० नवीन प्रकरणे नोंदवली गेली. ही जुलै २०२० नंतरची सर्वाधिक दैनिक संख्या आहे.