तेलंगणा विधानसभेसाठी आज ( ३० नोव्हेंबर ) मतदान पार पडत आहे. भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तेलंगणात तळ ठोकला होता. अशातच तेलंगणात प्रचारसभेवेळी एक अनुवादक भाषणाचं भाषांतर करताना कसा अडचणीत सापडला होता, याचा किस्सा राहुल गांधींनी सांगितला आहे.
राहुल गांधी म्हणाले, “मी हिंदीत बोलताना पाच शब्द बोलत होतो. मला वाटलं, तेलुगूत किमान पाच-सात शब्दांत अनुवाद होईल. पण, अनुवादक २०, २५ ते ३० शब्द बोलायचा. कधी कधी मी बोरिंग बोलायचो. पण, तेलुगूत तेच ऐकून समोरील नागरिक आनंदी व्हायचे. तर, कधी चांगलं बोललो, तर नागरिक शांत बसायचे.”
“मी स्टेजवर फक्त हसत होतो. कारण, मला काही बोलताच येत नव्हते,” अशी मिश्कील टिप्पणीही राहुल गांधींनी केली आहे. केरळमधील कोझिकोड येथे मुस्लीम लीगचे दिवंगत नेते पी. सेठी. हाजी यांच्यावरील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राहुल गांधी बोलत होते. यावेळी खासदार अब्दुसमद समदानी यांनी राहुल गांधींच्या भाषणाचं मल्याळमध्ये अनुवादन केलं.
राहुल गांधी म्हणाले, “समदानी हे चांगले अनुवादक आहेत. या सोहळ्यात भाषणाचे भाषांतर करताना कुठलीही समस्या येणार नाही, याची मला खात्री आहे.”
राहुल गांधींनी पी. सेठी. हाजी यांचा मुलगा पी. के. बशीर यांचं कौतुक केलं आहे. “हाजी यांच्याबद्दल मला जास्त माहिती नाही. कारण, मी त्यांना कधीही भेटलो नव्हतो. पण, त्यांच्या मुलाकडे पाहून ते कसे असतील, याचा अंदाज लावू शकता.”