पीटीआय, नवी दिल्ली
बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींना माफ करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीतून न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी माघार घेतली आहे. नवीन खंडपीठ स्थापण्यात येईल आणि त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले.
न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि बेला त्रिवेदी यांचे खंडपीठ मंगळवारच्या कामकाजासाठी बसले असता, न्यायमूर्ती रस्तोगी यांनी स्पष्ट केले, की, त्यांच्या सहकारी न्यायाधीश त्यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी करू इच्छित नाहीत.न्या. त्रिवेदी यांनी यामागचे कारण मात्र नमूद केले नाही. न्यायमूर्ती रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आदेश दिले की, आमच्यापैकी एक न्यायमूर्ती नसलेल्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी व्हावी.
बिल्किस बानो यांची बाजू मांडणाऱ्या वकील शोभा गुप्ता म्हणाल्या, की न्यायालयाच्या हिवाळी सुट्टय़ा सुरू होणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी त्यांची इच्छा होती.याप्रकरणी दोषी ठरलेल्या ११ जणांची १५ ऑगस्ट रोजी गोध्रा उपकारागृहातून सुटका करण्यात आली. गुजरात सरकारने राज्याच्या शिक्षामाफी धोरणांतर्गत या दोषींना सोडण्याची परवानगी दिली होती.