बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं पाठिंबा दिला असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ‘फडणवीसांनी मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचे काम केलं आहे,’ अशी टीका पाटील यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने शुभम शेळके यांना उमेदवारी दिली आहे. शेळके यांना शिवसेनेनं पाठिंबा दिला असून, खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या प्रचारार्थ सभाही घेतली. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बेळगावमध्ये आज पत्रकार परिषद घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले,”पाच वर्षे भाजप महाराष्ट्रात सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. आता एकीकरण समितीविरोधात प्रचार करून आपण मराठी भाषिकांसोबत नसल्याचे त्यांनी सिद्ध केले असून, मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचे काम केलं आहे,” अशी टीका त्यांनी केली.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अनेकदा मराठीजनांच्या हक्कासाठी या भागात आंदोलनं केली आहेत. महाराष्ट्राची, मराठीजनांची एकजूट कायम राहावी यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहतो, हा पाठिंबाही त्याचाच भाग आहे,” असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

“मराठी लोकांचा आवाज संसदेत बुलंद करण्यासाठी याआधी महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभा निवडणूक लढवली होती. इथल्या विधिमंडळातही समितीचे लोकप्रतिनिधी आहेत. शुभम शेळके हा तरुण मराठी माणसांचे प्रश्न लोकसभेत पोटतिडकीने मांडेल याबाबत शंका नाही,” असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Belgaum lok sabha bypoll prestige battle for bjp jayant patil devendra fadnavis shubham shelke bmh