मुंबई : प्रसिद्ध उद्याोगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर गुरुवारी संध्याकाळी वरळी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात, पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी नरिमन पॉइंट येथील एनसीपीए नाट्यगृह संकुलाच्या आवारात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी राजकारणी, उद्याोगपती तसेच टाटा उद्याोग समूहातील कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक यांची दिवसभर रीघ लागली होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंत्यदर्शन घेतले. टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नरिमन पॉइंट परिसरात कर्मचारी आणि सामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली. सामाजिक भान असलेल्या या उद्याोगपतीला निरोप देताना उपस्थितांकडून ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देऊन मानवंदना दिली जात होती.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय उद्याोग जगताचे नाव नेणारे उद्याोगपती, सामाजिक भान जपणारे, दानशूर, द्रष्टे उद्याोगपती, टाटा उद्याोग समूहाचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून नरिमन पॉइंट येथील एनसीपीए नाट्यगृहाच्या प्रांगणात ठेवण्यात आले होते.

हेही वाचा : सोयाबीनला हमीभाव अन् खरेदी केंद्रही नाही; शेतकऱ्यांच्या लुटीच्या तक्रारी

टाटा कुटुंबीयांपैकी या वेळी रतन टाटा यांच्या सावत्र आई सिमॉन टाटा, त्यांचे बंधू नोएल टाटा, जिम्मी टाटा, माया टाटा आणि लेह टाटा हे उपस्थित होते. टाटा यांचे अत्यंत निकटचे सहकारी, व्यवस्थापक शंतनू नायडू उपस्थित होते. तसेच टाटा उद्याोग समूहाच्या विविध संस्थांचे कर्मचारी गर्दीचे व्यवस्थापन करत होते. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रतन टाटा यांचे पार्थिव त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानातून एनसीपीए येथे आणण्यात आले. तेव्हापासून अंत्यदर्शनासाठी असलेली रांग दुपारी साडेतीन वाजले तरी ओसरत नव्हती. या वेळी सर्वधर्मीय प्रार्थना म्हणण्यात आल्या. हिंदू, मुस्लीम, शीख, बौद्ध धर्मगुरूंची या वेळी उपस्थिती होती. त्यानंतर प्रत्यक्ष अंत्ययात्रेला सुरुवात झाली तेव्हा उपस्थितांपैकी अनेकांच्या भावनांचा बांध फुटला. कर्मचारीवर्गही सुन्न झाला होता.

अंत्ययात्रा एससीपीएच्या प्रांगणातून बाहेर पडल्यानंतर बाहेर वाट पाहत असलेल्या जनसमुदायातून ‘रतन टाटा अमर रहे’च्या घोषणा घुमल्या. समुद्र किनाऱ्यावर थांबलेले नागरिकही अंत्ययात्रेबरोबर चालू लागले. ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी परिसर निनादला.

महापालिकेच्या वरळी येथील माता रमाबाई आंबेडकर स्मशानभूमीत गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास पारशी समुदायाच्या पद्धतीनुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. टाटा यांचे कुटुंबीय, नातेवाईक व अन्य नजीकचे सहकारी अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत दाखल झाल्यानंतर अंत्यविधी सुरू झाले. जवळपास तासाभराच्या विधींनंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास विद्याुत दाहिनीत टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि एका युगाचा अंत झाला.

हेही वाचा : सोलापूर: घर जागेचा वादातून सख्ख्या भावाचा खून

लाडका श्वान जागचा हलेना…

टाटा उद्याोग समूहाचे मुख्य कार्यालय येथे रतन टाटांबरोबर सावलीसारखा वावरणारा त्यांचा लाडका श्वान गोवा याला दुपारच्या सुमारास अंत्यदर्शनासाठी एनसीपीए येथे आणण्यात आले होते. टाटांच्या पार्थिवाकडे पाहणाऱ्या, तेथून न हलणाऱ्या श्वानाला पाहून उपस्थित गहिवरले. गोवाला तेथून दूर करताना कर्मचारीवर्ग अक्षरश: हळहळत होता.

राज्य मंत्रिमंडळाची श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ उद्याोगपती पद्माविभूषण रतन टाटा यांना ‘ भारतरत्न ’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर जाहीर करून गौरविण्यात यावे, अशी विनंती करणारा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा प्रस्ताव आणि शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. बैठकीत टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

हेही वाचा : Non Creamy Layer Income Limit : नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा वाढवण्यासाठी राज्याची केंद्राकडे विनंती; ओबीसींना दिलासा मिळणार का?

रतन टाटांच्या इच्छेनुसार टाटा मोटर्सकडून सुटी न घेता काम

पिंपरी : ‘माझ्या निधनानंतरही काम बंद नको,’ या रतन टाटा यांच्या इच्छेचा मान राखून पिंपरी-चिंचवडमधील टाटा मोटर्स कंपनी गुरुवारीही सुरू राहिली. सर्व कामगारांनी नेमून दिलेले काम केले. अर्थात, रतन टाटा यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोरकी भावना मात्र ते लपवू शकले नाहीत. अनेक कामगार त्यांच्याबद्दल बोलताना भावुक होत असल्याचे दृश्य कंपनीत होते.