पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारमधील वाद गेल्या काही दिवसांपासून विकोपाला जात असल्याचं दिसत आहे. यास चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा बैठकीवरुन पश्चिम बंगाल विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष पेटला आहे. पंतप्रधांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उशिरा हजेरी लावली होती. तसेच नुकसान झालेल्या भागाचा अहवाल देत तेथून निघून गेल्या होत्या. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय यांनी दिल्लीत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक पाऊल पुढे जात अल्पन बंडोपाध्याय यांची मुख्य सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. तसेच मुख्य सचिवपद हरिकृष्ण द्विवेदी यांच्याकडे सोपवलं आहे.
करोना काळात पश्चिम बंगाल सरकारच्या विनंतीनंतर अल्पन बंडोपाध्याय यांना तीन महिन्यांचा अवधी वाढवून देण्यात आला होता. ते ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार होते. “आमचे मुख्य सचिव आज सेवानिवृत्त झाले आहेत. पण ते मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून तीन वर्षे सेवा करतील”, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं आहे.
I will not allow Alapan Banerjee to leave Nabanna. He is now the Chief Adviser to Chief Minister: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/aXSOb9LD4w
— ANI (@ANI) May 31, 2021
यास चक्रीवादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली होती. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मुख्य सचिव बंडोपाध्याय यांनी अर्धा तास उशिरा हजेरी लावल्याची सरकारी सूत्रांची माहिती आहे. तसेच अहवाल दिल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या कार्यक्रमात जायचं आहे असं सांगून निघून गेल्या होत्या. त्यानंतर बंडोपाध्याय यांना कार्यमुक्त करुन केंद्र सरकारच्या सेवेत पाठवण्याचे आदेश दिले होते.
धक्कादायक! बंगालमध्ये जमावाने मृत मुलाच्या हातून अल्पवयीन मुलीच्या भांगेत भरलं सिंदूर
अल्पन बंडोपाध्याय १९८७च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. बंडोपाध्याय नियमांचं पालन करणारे अधिकारी आहेत. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वारंवार कौतुक केलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्राने तीन आयपीएस अधिकाऱ्यांना रिलीव करण्यास सांगितलं होतं. मात्र या आदेशानंतरही राज्य सरकारने त्यांना रिलीव केलं नव्हतं.