Murshidabad Violance News: वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यापासून त्यावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये वक्फ विधेयकावरून झालेल्या हिंसक घटनांनंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी विधेयकाला तीव्र विरोध केला असताना दुसरीकडे मुर्शिदाबादमध्ये उसळलेल्या हिंसक घटनांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. मात्र, या सगळ्या घडामोडींमध्ये या भागातील हिंसाचारग्रस्त नागरिक मात्र देशोधडीला लागण्याच्या उंबरठ्यावर उभे असल्याचं विदारक चित्र सध्या दिसत आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या नागरिकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत.
गेल्या आठवड्यात मुर्शिदाबादमध्ये वक्फ बोर्ड विधेयक मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोठा हिंसाचार उफाळला. परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे कितीही दावे प्रशासनाकडून करण्यात येत असले, तरी बेघर झालेल्या स्थानिकांसमोर आता अडचणींचा मोठा डोंगर उभा राहिला आहे.
२४ वर्षांची सप्तमी मंडोल तिच्या अवघ्या आठ दिवसांच्या चिमुकल्यासह बेघर झाली. हिंसाचारात तिच्यासह बेघर झालेल्या जवळपास ४०० स्त्री-पुरुष व लहानग्यांना परलालपूरमध्ये एका शाळेत आसरा घ्यावा लागला. या शाळा आता हिंसाचारग्रस्त नागरिकांसाठी सुरक्षित ठिकाण ठरल्या आहेत. पण इथेही त्यांच्यावर कुणीतरी कधीतरी अचानक येऊन हल्ला करेल की काय या भीतीचं सावट कायम आहे.
आत्तापर्यंत तीन मृत्यू, ४०० बेघर
वक्फ विधेयक मंजुरीनंतर पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये सुरू झालेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील हरगोविंद दास (७२) व चंदन दास (४०) यांना तर त्यांच्या राहत्या घरांमधून जमावाने खेचून बाहेर काढलं आणि त्यांची हत्या केली. या प्रकरणात आत्तापर्यंत २०० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्याचे दावे पोलिसांकडून केले जात आहेत. पण आपलं राहतं घर सोडावं लागलेल्या स्थानिकांमधलं भीतीचं वातावरण मात्र यामुळे कमी होताना दिसत नाही.
सप्तमी सांगते, “शुक्रवारी दुपारी जमावानं शेजारचं घर पेटवून दिलं आणि आमच्या घरावर दगडफेक केली. माझे आई-वडील आणि मी घरात लपून राहिलो. संध्याकाळी जमाव निघून गेल्यानंतर आम्ही आमचं घर सोडलं. तोपर्यंत बीएसएफच्या जवानांनी तिथे गस्त सुरू केली होती. आम्ही तेव्हा घातलेले कपडेच आता आमच्याकडे उरले आहेत. आम्ही कसंबसं नदीकाठी पोहोचलो आणि नावेतून पलीकडे गेलो”.
मध्यरात्री बोटीतून प्रवास
“आम्ही नदीकाठी पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती. आम्ही बोटीवर चढलो आणि नदी पार केली. पलीकडे एका गावात एका कुटुंबानं आम्हाला आसरा दिला. कपडे दिले. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथून निघून या शाळेत आलो. नदीतून इकडे येताना माझ्या बाळाला तापही आला होता. आता आमचं आयुष्य इतरांच्या भरवश्यावर अवलंबून आहे. आमच्या स्वत:च्या जमिनीवरच आम्ही उपरे ठरलो आहोत. कदाचित आम्ही पुन्हा कधीच तिकडे परत जाणार नाही. ते जर परत आमच्यावर हल्ला करायला आले तर?” असा भीतीयुक्त प्रश्न सप्तमी विचारते!
या शाळेत इथे आलेल्या लोकांसाठी कपड्यांची, अन्नाची आणि औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस व शीघ्र कृती दलाच्या जवानांचा पहारा शाळेवर कायम तैनात आहे. मध्यान्न भोजनाचं स्वयंपाकघर आता या लोकांसाठी जेवण बनवायला वापरलं जातं. त्यामुळे वक्फ विधेयकावरून राष्ट्रीय पातळीवर किंवा पश्चिम बंगाल सरकारकडून घेण्यात आलेल्या भूमिकांवरून एकीकडे राजकारण रंगत असताना दुसरीकडे या हिंसाचारग्रस्तांचं आयुष्य मात्र पणाला लागल्याची परिस्थिती उद्भवली आहे.