पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची कन्या सुचेतना भट्टाचार्य यांनी लिंग बदलाचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. लिंग बदलाचे ऑपरेशन केल्यानंतर त्यांची ओळख सुचेतन अशी होणार आहे. या लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रक्रिया आणि प्रमाणपत्रांसाठी त्यांनी कायदेशीर सल्ला घेतला असून याबाबत मानसोपचार तज्ज्ञांशीही त्यांनी संपर्क साधला आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
सुचेतना यांनी अलिकडेच एका एलजीबीटीक्यू कार्यशाळेत हजेरी लावली होती. त्यांनी स्वतःची ओळख पुरुष म्हणून केली आणि हीच ओळख त्यांना आता शारीरिकदृष्ट्याही करायची आहे, म्हणून त्यांनी लिंग बदलाचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा >> “नरेंद्र मोदी जगातील सर्वांत लोकप्रिय नेते का?” न्यू यॉर्क टाईम्समध्ये पंतप्रधानांचं कौतुक
“LGBTQ चळवळीचा एक भाग म्हणून मी ही शस्त्रक्रिया करत आहे. ट्रान्स मॅन म्हणून होणारा सामाजिक छळ मला थांबवायचा आहे”, असंही त्या पुढे म्हणाल्या. “मी एक प्रौढ व्यक्ती आहे. माझं वय आता ४१ वर्षे आहे. मी माझ्या आयुष्याशी संदर्भातील माझे निर्णय घेऊ शकते. त्यामुळे कृपया माझ्या पालकांना यात ओढू नका”, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. “मी स्वतःला मानसिकदृष्ट्या पुरुष समजते. त्यामुळे शरीरानेही मला आता पुरुष व्हायचे आहे”, असंही त्या पुढे म्हणाल्या. “एवढंच नव्हे तर, त्यांच्या या निर्णयाला त्यांचे वडिलही समर्थन देतील असा त्यांना विश्वास आहे.
“मी हा निर्णय घेतला आहे. मी लढेन. माझ्यात ती हिंमत आहे. कोण काय म्हणतो याची मला पर्वा नाही. प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मी तयार आहे”, असंही सुचेतना म्हणाल्या. “हा माझा एकटीचा निर्णय आहे. त्यामुळे या बातमीचा विपर्यास कोणी करू नये. हा माझा स्वतःचा संघर्ष आहे. हा संघर्ष मला एकट्याने लढायचा आहे. हा संघर्ष न करण्यापेक्षा उशीर झालेला चांगला. मला लहानपणापासूनच पुरूष व्हायचं होतं. माझ्या या निर्णयाला अनेकांनी पाठिंबा दिला तर अनेकांनी माझ्यावर टीका केली. मानसिकदृष्ट्या मी एक ट्रान्स मॅन आहे आणि शरीरानेसुद्धा मला तसेच व्हायचे आहे”, असं सुचतेना यांनी स्पष्ट केलं.
“LGBTQ समुदायातील लोकांना मी धीट होण्यास सांगेन. कदाचित या निर्णयामुळे माझ्या आई-वडिलांच्या नावे वाद होण्याची शक्यता आहे. परंतु, मला समजून घ्या”, असंही आवाहन त्यांनी केलं.