पीटीआय, कोलकाता : शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणात पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी अटक केल्यानंतर येथील न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची ईडी कोठडी सुनावली, अशी माहिती चॅटर्जी यांच्या वकिलांनी दिली. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या चॅटर्जी यांना अटकेनंतर बंकशाल न्यायालयात हजर करण्यात आले. शनिवारी ईडीचे विशेष न्यायालय बंद असल्याने त्यांना या न्यायालयात हजर करण्यात आले. अटकेपूर्वी चॅटर्जी यांची त्यांच्या निवासस्थानी सुमारे २६ तास चौकशी करण्यात आली.

पश्चिम बंगाल शालेय सेवा आयोगाच्या शिफारशींनुसार झालेली गट क आणि ड कर्मचाऱ्यांची भरती तसेच शासन प्रायोजित, अनुदानित शाळांत झालेल्या शिक्षकांच्या भरतीची चौकशी कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करीत आहे. या गैरव्यवहारातील पैशांच्या व्यवहारांचा मागोवा ईडीकडून घेतला जात आहे. ईडीने शुक्रवारी यासंबंधात सुमारे बारा जणांच्या घरांवर छापे टाकले. यात दोन मंत्र्यांचा समावेश आहे. या छाप्यांत सुमारे २० कोटी रुपयांची रोख जप्त करण्यात आल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले.

Story img Loader