पीटीआय, कोलकाता
पश्चिम बंगालच्या १९ जिल्ह्यांतील ज्या सुमारे ७०० मतदान केंद्रांवरील पंचायत निवडणुकांचे मतदान रविवारी बाद ठरवण्यात आले होते, तेथे सोमवारी फेरमतदान घेण्यात आले. या दरम्यान हिंसाचाराची कुठलीही मोठी घटना झाल्याचे वृत्त नाही.मतपेटय़ांशी छेडछाड आणि हिंसाचाराचे आरोप झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ६९६ मतदान केंद्रांवर फेरमतदानाचा आदेश रविवारी सायंकाळी दिला. या हिंसाचारात १५ जण ठार झाले.
सोमवारी सकाळी ७ वाजता कडक सुरक्षाव्यवस्थेत फेरमतदानाला सुरुवात झाली. राज्य पोलिसांशिवाय केंद्रीय दलांचे प्रत्येकी चार कर्मचारी प्रत्येक केंद्रात तैनात करण्यात आले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत ५३.९५ टक्के मतदानाची नोंद झाली. काही केंद्रांवर मतपेटय़ा वेळेवर न पोहचल्यामुळे तेथे मतदान उशिरा सुरू झाले व त्यामुळे तेथे मतदानासाठी जादा वेळ देण्यात आला. फेरमतदान झालेल्या केंद्रांसह इतर ठिकाणची मतमोजणी मंगळवारी होणार आहे.
दरम्यान, , ज्या टिकाणी मतदान पुन्हा घेतले जायला हवे होते अशा ‘हजारो मतदान केंद्रांना’ राज्य निवडणूक आयोगाने महत्त्व दिले नसल्याचा आरोप भाजपने सोमवारी केला. शनिवारच्या मतदानादरम्यान हजारो मतदान केंद्रांवर झालेल्या गैरप्रकारांचे आपणपुरावे गोळा करत असून त्यांच्या आधारे कलकत्ता उच्च न्यायालयात दाद मागू, असे विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी म्हणाले.