Yogi Adityanath on Bengal Riots : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पश्चिम बंगालमध्ये चालू असलेल्या दंगलींबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले, “लातों के भूत बातों से नहीं मानतो, हे दंगेखोल काठी उगारल्याशिवाय ऐकणार नाहीत.” उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यातील राजा नरपती सिंह यांच्या स्मृतीस्थळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील अनेक विकासकामांचं लोकार्पण केलं, तसेच अनेक कामांचं भूमिपूजनही केलं. या ठिकाणी आयोजित सभेत बोलताना त्यांनी पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरही भाष्य केलं.

योगी आदित्यनाथ म्हणाले, “२०१७ च्या आधी उत्तर प्रदेश राज्य कसं होतं ते आठवून पाहा. दर दोन-तीन दिवसांनी राज्यातील कुठल्या ना कुठल्या भागात दंगली होत होत्या. काठी हाच या दंगलींवरील उपाय आहे. त्यांना फटके देणं हाच एक उपचार आहे. काठीशिवाय हे दंगेखोर ऐकणार नाहीत. आता तुम्ही पश्चिम बंगालमधील स्थिती पाहतच आहात. राज्यात दंगली होतायत आणि मुख्यमंत्री स्वस्थ बसून आहेत. त्या काहीच बोललेल्या नाहीत.”

दंगेखोरांना समजुतीची भाषा कळत नाही. यांना केवळ काठीचीच भाषा समजते : योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ म्हणाले, “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री दंगेखोरांना शांतीदूत संबोधतात. परंतु, या दंगेखोरांना समजुतीची भाषा कळत नाही. यांना केवळ काठीचीच भाषा समजते. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली तिथल्या सरकारने दंगेखोरांना सूट दिली आहे. त्यामुळे संपूर्ण मुर्शिदाबाद एक आठवड्यापासून जळत आहे आणि सरकारने मौन बळगलं आहे. या अराजकतेवर लगाम लावायला हवा.”

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले, “बंगालमधील सरकार स्वस्थ बसून असलं तरी तिथलं न्यायालय गंभीर आहे. त्यामुळे मी न्यायालयाचे आभार मानेन. त्यांनी केंद्र सरकारला सांगून राज्यात केंद्रीय सुरक्षा बल तैनात करायला लावलं. तिथल्या हिंदूंना वाचवण्यासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय संरक्षण दल राज्यात तैनात आहे.”

योगी आदित्यनाथ म्हणाले, “तुम्ही तिथल्या हिंदूंची आपबिती पाहिली, ऐकली असेल. तरीदेखील तिथले सत्ताधारी शांत बसून आहेत. काँग्रेसने व समाजवाद्यांनी देखील मौन बाळगलं आहे. दुसऱ्या बाजूला दंगेखोर गरीब हिंदूंना धमक्यांवर धमक्या देत आहेत. बांगलादेशात जे झालं ते पश्चिम बंगालमध्ये करण्याची धमकी देत आहेत. काहीजण निलाजरेपणाने त्या सगळ्याचं समर्थनही करत आहेत. माझा या सगळ्या लोकांना प्रश्न आहे की तुम्हाला बांगलादेश आवडत असेल तर बांगलादेशला जा, भारताच्या भूमीवर ओझं बनून का राहताय?