विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पश्चिम बंगालच्या चोप्रा ब्लॉक येथे एका जोडप्याला भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. या माराहणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सदर व्हिडीओत मारहाण करणारा आरोपी ताजिमूल इस्लाम उर्फ जेसीबी याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चोप्रा विधानसभेचे तृणमूल काँग्रेसचे आमदार हमीदूल रहमान यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. सदर घटना समोर आल्यानंतर आमदार हमीदूल रहमान यांनी एक वादग्रस्त विधान केले असून आता विरोधकांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला घेरले आहे.

पोलिसांनी रविवारी आरोपी ताजिमूलला अटक केल्यानंतर आमदार हमीदूल रहमान यांनी ज्या महिलेला बेदम मारहाण झाली, तिलाच दोषी ठरविण्याचा प्रयत्न केला. ताजिमूलशी कोणतेही संबंध नसल्याचे सांगून त्यांनी हात झटकले असले तरी या कृत्याचे मात्र त्यांनी अप्रत्यक्षरित्या समर्थन केले. पीडित महिलेचे कृत्य समाजविरोधी असल्याचे ते म्हणाले. तसेच हा विषय त्या गावातील असून त्याचा आणि पक्षाचा काडीचाही संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून जोडप्याला बेदम मारहाण, रस्त्यावरील ‘त्या’ कृत्यामुळे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचाही संताप!

मुस्लीम राष्ट्रांत असंच होतं…

माध्यमांशी बोलताना आमदार रहमान म्हणाले, “आम्ही या घटनेचा निषेध करतो. पण त्या महिलेनेही चुकीचं कृत्य केलं. तिनं स्वतःचा नवरा, मुलगा आणि मुलीला सोडून दिला आणि ती दृष्ट बनली. अशा कृत्याविरोधात मुस्लीम राष्ट्रात काही नियम आणि न्याय पद्धती आहे. तरीही जे झालं, ते थोडं अती होतं. आता या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.”

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजूमदार यांनी मात्र आमदार रहमान यांच्या मुस्लीम राष्ट्र या विधानावर चिंता व्यक्त केली. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी रहमान यांच्या विधानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. “आमदार रहमान यांनी मुस्लीम राष्ट्राचा दाखला देऊन कोणत्यातरी कायद्याप्रमाणे शिक्षेचे प्रावधान असल्याचे म्हटले. हा गंभीर चिंतेचा विषय आहे”, असे कॅप्शन मुजूमदार यांनी लिहिले आहे.

विरोधकांनी काय आरोप केले?

भाजपा आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या राजवटीचा भेसूर चेहरा यानिमित्ताने पुन्हा दिसला आहे. व्हायरल व्हिडीओत मारहाण करणारा आरोपी हा स्वतःला न्यायदूत समजतो. चोप्राचे आमदार हमीदुल रहमान यांचा तो विश्वासू सहकारी आहे.

पश्चिम बंगालच्या प्रत्येक गावात संदेशखालीप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या महिलांसाठी शाप बनल्या आहेत. ज्याप्रमाणे शेख शाहजहानसाठी ममता बॅनर्जी उभ्या राहिल्या होत्या. त्याचप्रमाणे या प्रकरणातील आरोपीला वाचविण्यासाठी त्या आता पुढे येतील का? असा प्रश्न उपस्थित करत अमित मालवीय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली.

दरम्यान, विरोधकांच्या आरोपांवर टीएमसीनेही उत्तर दिलं आहे. टीएमसीचे जिल्हाध्यक्ष कनय्यालाल अग्रवाल म्हणाले की, “मारहाण करण्यात आलेल्या स्त्री आणि पुरुषाचे विवाहबाह्य संबंध होते. हे परिसरातील लोकांना अमान्य होतं. म्हणून साळिशी सभा घेण्यात आली होती. परंतु, ताजिमुलने जे केलं त्याचं आम्ही समर्थन करत नाही. आम्ही त्याच्याही भूमिकेची चौकशी करणार आहोत.”