Accident News : देशभरात दररोज अपघाताच्या अनेक घटना घडताना पाहायला मिळातात. आता बंगळुरुमधील नेलमंगळा तालुक्यातील बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत कुटुंब हे सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे होते अशी माहिती सांगितली जाते. एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मोरबगी गावावर शोककळा पसरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे कुटुंब ख्रिसमसच्या सुट्टी निमित्ताने बेंगळुरूवरून जतकडे आपल्या गावी जात होते. मात्र, गावाकडे जात असताना एक कंटेनर त्यांच्या चारचाकी गाडीवर अचानक पलटी झाल्यामुळे एका आयटी इंजिनिअरसह ६ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. यामध्ये चंद्रम इप्पाळगोळ, त्यांची पत्नी गौराबाई (४० वर्षे), त्यांची मुले ज्ञान (१६ वर्षे) आणि दीक्षा (१० वर्षे), त्यांची मेहुणी विजयालक्ष्मी (३५ वर्षे) आणि त्यांची भाची आर्या (६ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. चंद्रम इप्पाळगोळ हे मूळ सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोरबागी गावाचे रहिवासी होते. चंद्रम इप्पाळगोळ हे बंगळुरू येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत सीईओ होते. त्यांचे कुटुंब देखील त्यांच्याबरोबर बेंगळुरू येथे राहत होते. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

हेही वाचा : GST On Popcorn : आता पॉपकॉर्नवरही जीएसटी, चवीनुसार कर द्यावा लागणार!

बेंगळुरू ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रम इप्पाळगोळ आणि त्याचे कुटुंब कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मोरबागी येथील त्यांच्या गावी जात होते. ते त्यांच्या आजारी वडिलांना भेटायला आणि ख्रिसमस सुट्टीनिमित्त जात होते. मात्र, एक भरधाव कंटेनर ट्रक त्याच्या गाडीवर येऊन पलटी झाला. चंद्रम इप्पाळगोळ यांनी दोन महिन्यांपूर्वीच चारचाकी गाडी खरेदी केली होती.

माहितीनुसार, समोरून येणाऱ्या दुसऱ्या एका वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात जात या ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला धडक दिली. यामध्ये त्या कारमधील ६ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत अधिक तपास सुरु केला आहे. तसेच ट्रकच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचा चालकही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bengaluru accident news fatal accident on bangalore national highway six members of the same family died gkt