Bengaluru Accident : कर्नाटकच्या बंगरुळू शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. बंगरुळू शहरातील एका रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. पण यावेळी जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणामुळे दोन महिलांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. त्या दोन्ही महिलांची दोन मुले देखील गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३५ वर्षीय सुमती आणि ३५ वर्षीय सोनी कुमारी यांचा समावेश आहे. या दोन महिलांमध्ये एक महिला चार महिन्यांची गर्भवती होती. या अपघातानंतर पोलिसांनी जेसीबी चालकाला ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, बेंगळुरूमधील सदुगुंटेपल्या या परिसरात रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. रस्त्याच्या दुरूस्तीचं काम सुरु असताना जेसीबी मशीन अचानक एका विजेच्या खांबाला धडकल्याने विजेचा खांब कोसळला आणि यामध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी बैयप्पनहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेप्रकरणी जेसीबी चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

जेसीबी रिव्हर्स घेत असताना घडली घटना

सदुगुंटेपल्या परिसरात रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबी चालक जेसीबी रिव्हर्स घेत होता, पण तितक्यात जेसीबीची अचानक एका विजेच्या खांबाला धडक बसली. मात्र, याचवेळी दोन महिला आपल्या मुलांना शाळेतून घरी घेऊन परतत होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेसीबी चालकाने जेसीबी रिव्हर्स घेत असताना अचानक विजेच्या खांबाला धडक दिल्याने खांब महिला व लहान मुलांवर कोसळला. या अपघातात सोनी आणि सुमती यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची दोन्ही मुले जखमी झाली आहेत.

दरम्यान, या अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी जेसीबी चालकावर गंभीर आरोप केला आहे. जेव्हा जेसीबी चालक जेसीबी रिव्हर्स घेत होता तेव्हा ड्रायव्हरने हेडफोन घातले होते असा आरोप स्थानिक करत आहेत. दरम्यान, अपघातानंतर स्थानिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे. वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शींचे म्हणणं आहे की जेसीबी चालकाने हेडफोन घातले होते आणि जेव्हा जेसीबीने विजेच्या खांबाला धडक दिली तेव्हा लोक ओरडत होते, पण तरीही जेसीबी चालकाला ऐकायला गेलं नाही. त्यामुळे हा अपघात नसून खून असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जेसीबी चालकाला ताब्यात घेतलं आहे. या अपघाताच्या घटनेनंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.

Story img Loader