चोरी, दरोडे घालून गुन्हेगार सहज पैसे मिळवत असतात. पण काही चोर रॉबिन हूडही असतात. रॉबिन हूड चोरलेल्या वस्तू किंवा त्याचा मोबदला गरीबांमध्ये वाटत असे, अशी कथा आहे. बंगळुरूमध्ये अशाच एका रॉबिन हूड चोराला पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली असता त्यातून सत्य समोर आले. काही दिवसांपूर्वी बंगळुरू पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक केली. चोरी केल्यानंतर चौकशी केली असता एका चोराने कर्करोगावरील उपचारासाठी चोरी केल्याचे कारण सांगितले.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, अशोक उर्फ ॲपल हा बंगळुरूमध्ये फळं विकण्याचे काम करत होता. सहज पैसे मिळविण्यासाठी त्याने दुचाकी चोरण्यास सुरुवात केली. अशोक बंगळुरू शहरातील विविध ठिकाणी केटीएम आणि पल्सर दुचाकींना चोरत असे. नुकतेच त्याने त्याचा सहकारी सतीशबरोबर बंगळुरूच्या गिरी नगर येथे एक सॉफ्टवेअर इंजिनिअरची दुचाकी चोरली. बंगळुरू पोलिसांनी सदर प्रकरणाचा छडा लावत असताना त्यांनी अशोक आणि सतीशला अटक केली. अशोक हा पक्का चोर असून त्यावर १५ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांना कळले. काही महिन्यांपूर्वीच तो एका गुन्ह्यात तुरुंगातून सुटला होता, त्यानंतर त्याने पुन्हा चोरी केली होती.
पोलिसांनी अशोकची चौकशी केल्यानंतर त्याने चोरी का केली? हे सांगितले. अशोकची पत्नी त्याला सोडून गेल्यानंतर एका दाम्पत्याने अशोकला राहण्यासाठी आसरा दिला. या दाम्पत्यामधील महिलेला कर्करोगाचे निदान झाले होते. तिच्यावर उपचारासाठी अशोक दुचाकी चोरायचा आणि त्यातून मिळविलेल्या पैशातून उपचाराचा खर्च भागवायचा. अशोकने दिलेली माहिती वाचून पोलिसांनाही धक्का बसला.
दरम्यान दुसरा आरोपी सतीश हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर ४० हून अधिक गुन्हे दाखल असून त्याच्यावर खून आणि दरोड्याचेही आरोप आहेत. या दोघांनी चोरी केलेल्या दुचाकी ज्यांना ज्यांना विकल्या त्यांच्याकडून त्या परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.