Wolfdog in India: पाळीव प्राण्यासाठी माणसाचे प्रेम काही निराळेच असते. जगभरात पाळीव प्राण्यांवर प्रेम करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. या प्राण्यांसाठी वाटेल तितके पैसे खर्च करण्याची तयारी काही लोक ठेवत असतात. बंगळुरूमध्ये एका ब्रीडरने श्वानाची दुर्मिळ प्रजाती मिळविण्यासाठी प्रचंड मोठी रक्कम खर्च केली. एस. सतीश असे या श्वानप्रेमीचे नाव आहे. अत्यंत दुर्मिळ असलेला अर्धा लांडगा आणि अर्धा श्वान यांचे संकर असलेल्या प्रजातीचा श्वान खरेदी करण्यासाठी त्यांनी ४.४ दशलक्ष पौंड (५० कोटी रुपये) खर्च केले आहेत. द सन संकेतस्थळाने यासंबंधी वृत्त दिले आहे.

सदर श्वान हा वुल्फडॉग प्रकारातला पहिलाच श्वान आहे. खराखुरा लांडगा आणि कॉकेशियन शेफर्ड यांच्या संकरातून त्याचा जन्म झाला. या श्वानाचे नाव कॅडाबॉम्स ओकामी असे आहे. फेब्रुवारी महिन्यात सतीश यांनी हा श्वान विकत घेतला.

कॉकेशियन शेफर्ड हा शक्तीशाली, आकाराने मोठा आणि केसाळ श्वान आहे. कॉकेशियस पर्वतरांगात त्याचे मूळ असल्याचे मानले जाते. तेथील लोक वन्य प्राण्यांपासून पशुधनाचे रक्षण करण्यासाठी कॉकेशियन शेफर्ड पाळत असतात.

कसा आहे वुल्फडॉग

कॅडाबॉम्स ओकामीचा जन्म अमेरिकेत झाला. अवघ्या आठ महिन्यात त्याचे वजन ७५ किलो झाले आहे. ओकामीला दररोज तीन किलो कच्चे मांस खायला लागते.

सतीश यांनी सांगितले की, हा श्वान अत्यंत दुर्लभ जातीचा श्वान आहे. जो लांडग्यासारखा दिसतो. मला श्वान पाळण्याचा छंद आहे. त्यामुळे मी या श्वानासाठी ५० कोटी खर्च केले. मला भारतात नव्या नव्या जातीचे कुत्रे आणायचे आहेत. अशाप्रकारच्या वेगळ्या जातीच्या श्वानांना पाहण्यासाठी भारतातील लोक उत्सुक असतात. अनेकजण या श्वानाबरोबर फोटो काढतात.

एस. सतीश यांनी पुढे सांगितले की, सुमारे दशकभरापूर्वी त्यांनी श्वानांचे ब्रिडिंग करणे थांबवले होते. पण सध्या ते लोकांना दुर्मिळ जातीचे श्वान दाखवून भरपूर पैसे कमवतात. कॅडाबॉम्स ओकामीला एखाद्या इव्हेंटला नेण्यासाठी ते ३० मिनिटांचे २५ हजार रुपये आकारतात. याबद्दल ते म्हणाले की, हा श्वान दुर्मिळ असल्यामुळेच मी त्याला खरेदी केले. एखाद्या चित्रपटाच्या इव्हेंटला नेल्यानंतर अभिनेत्यापेक्षाही अधिक लक्ष ओकामीच वेधतो.

कॅडाबॉम्स ओकामी हा एस. सतीश यांच्या सात एकरच्या फार्महाऊसमध्ये राहतो. इथेच सतीश यांचे इतर श्वानही आहेत. प्रत्येक श्वानाला २० बाय २० फुटांची खोली देण्यात आली आहे. जिथे ते आरामात फिरू आणि आराम करू शकतात. सहा लोक श्वानांची काळजी घेण्याकरिता कामावर ठेवण्यात आले आहेत.

Story img Loader