बंगळुरुत आपल्या मुलाला जिवंत जाळणाऱ्या व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली आहे. अकाऊंट्सवरुन झालेल्या वादातून पित्याने रस्त्यातच मुलाला जिवंत जाळून टाकलं. रुग्णालयात उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. १ तारखेला वाल्मिकी नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत मुलगा अर्पित इमारतीमधून बाहेर येताना दिसत आहे. यावेळी आरोपी वडील सुरेंद्र त्याच्या मागून येतात आणि माचिसची काडी पेटवून त्याच्या अंगावर फेकतात. मुलगा यावेळी तिथेच उभा असतो. पहिली काडी वाया गेल्यानंतर वडील दुसरी काटी पेटवून टाकतात आणि मुलाचं शऱीर पेट घेतं. यानंतर तो तसाच आरडाओरडा करत पळत जाताना दिसत आहे.
स्थानिकांनी धाव घेत यावेळी आग विझवली आणि अर्पितला रुग्णालयात दाखल केलं. ६० टक्के भाजलेला अर्पित रुग्णालयात दोन दिवस मृत्यूशी झुंज देत होता. गुरुवारी सकाळी उपचारामदरम्यान त्याचं निधन झालं. शेजाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे.
सुरेंद्र यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. सुरेंद्र यांनी अर्पितकडे १.५ कोटींचा हिशोब लागत नसल्याने जाब विचारला असता तो देऊ शकला नाही. यानंतर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं अशी माहिती मिळत आहे.