बंगळुरुची सीईओ सूचना सेठवर तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. सध्या सूचना सेठ पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी या प्रकरणात काही महत्त्वाच्या बाबी समोर आणल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूचना आणि तिचा पती व्यंकट यांच्यात खटके उडत होते. त्यामुळेच त्यांचा घटस्फोटही झाला. आता पोलिसांनी ही माहितीही दिली आहे की मुलाची हत्या करण्याआधी सूचनाने तिचा पती व्यंकटला व्हॉट्स अॅपवर मेसेज केला होता.
सूचनाने पतीला केला होता What’s App मेसेज
सूचना सेठची चौकशी आणि या हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना हे समजलं आहे की सूचनाने तिच्या पतीला व्हॉट्स अॅप मेसेज केला होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सूचनाने पती व्यंकटला ६ जानेवारीला मेसेज करुन सांगितलं होतं की उद्या (७ जानेवारी) तू मुलाला भेटू शकतोस. मात्र त्यादिवशी सूचना आणि तिचा मुलगा त्या दिवशी बंगळुरुत नव्हते. त्यामुळे व्यंकट मुलाला भेटू शकला नाही. मुलाची भेट झाली नाही म्हणून व्यंकट इंडोनेशियाला गेला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी म्हणजेच ६ जानेवारीला सूचनाने पती व्यंकटला मेसेज करुन सांगितलं की तू उद्या मुलाला भेटू शकतोस. मात्र सूचना शनिवारीच गोव्याला निघून गेली. व्यंकट आणि सूचना यांच्यात खटके उडत होते. त्यामुळे त्यांनी घटस्फोटासाठी कोर्टात अर्जही केला होता. कोर्टाने दर रविवारी व्यंकट त्याच्या मुलाला भेटू शकतो असं म्हणत रविवारी भेट घेण्यास संमती दिली होती. त्यानंतर सूचना अस्वस्थ झाली होती. या अस्वस्थेतूनच तिने तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली असं पोलिसांचं म्हणणं आहे.
सूचना सेठवर मुलाच्या हत्येचा आरोप
सूचना सेठवर तिच्याच मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सूचनाला तिच्या या कृतीचा कुठलाही पश्चाताप झालेला नाही. ६ जानेवारी या दिवशी सूचना सेठ चार वर्षांच्या मुलाला घेऊन गोव्यातल्या एका सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये गेली होती. ८ जानेवारीच्या दिवशी मुलाचा मृतदेह बॅगेत भरुन ती कर्नाटकात चालली होती. त्याचवेळी पोलिसांनी तिला अटक केली. अटक केल्यानंतर जेव्हा तिची झडती घेण्यात आली तेव्हा पोलिसांना बॅगेत चार वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला.