एका प्रेमी युगुलाचा बाथरुममध्ये शॉवर घेताना मृत्यू झाला आहे. गॅस गिझरच्या कार्बन मोनॉक्साईडमुळे ही घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. एम चंद्रशेखर आणि यू सुधाराणी अशी या दोघांची नावं आहेत. या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघेही एका हॉटेलमध्ये नोकरी करत होते आणि लवकरच लग्न करणार होते. मात्र त्याआधीच बंगळुरुमध्ये ही घटना घडली आहे. इंडियन एक्स्प्रेसने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
चंद्रशेखर हा ३० वर्षांचा होता तर सुधाराणी बिन्नी ही २२ वर्षांची होती. हे दोघेही नंदी हिल्स भागात असलेल्या एका लक्झरी रिसॉर्टमध्ये काम करत होते. चंद्रशेखरने ताराबनाहळ्ळी भागात भाडे तत्त्वावर घेतलं होतं. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून त्यांचं हे घर १० किमी अंतरावर आहे. रविवारी ही घटना उघडीस आली. घरमालकाने दरवाजा ठोठावला. मात्र कुठलाही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर घर मालकाने ही बाब पोलिसांना कळवली. पोलिसांनी दरवाजा तोडला, त्यावेळी बाथरुममध्ये हे जोडपं मृतावस्थेत आढळून आलं.
चंद्रशेखर आणि सुधाराणी हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. लवकरच हे दोघं लग्न करणार होते. त्यांनी आपल्या लग्नाविषयी कुटुंबीयांनाही कल्पना दिली होती. १० जूनच्या दिवशी संध्याकाळी साधारण ६ वाजण्याच्या सुमाारास हे दोघेही चंद्रशेखरच्या घरी आले. त्यानंतर त्यांनी एकमेकांसह वेळ घालवला. काही तासांनी त्यांनी शॉवर घ्यायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी गॅस गिझर ऑन केला होता. साडेसात लिटरचा गॅस गिझर हा एलपीजी सिलिंडरला जोडलेला होता. त्यातल्या कार्बन मोनाक्साईडमुळे या दोघांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
चंद्रशेखर आणि सुधाराणी घरी आल्यापासून नेमकं काय काय घडलं? त्या सगळ्या प्रसंगांचा अंदाज आम्ही अद्याप लावू शकलेलो नाही. पण तूर्तास हा मृत्यू गॅस गिझरच्या कार्बन मोनॉक्साईडमुळे झाला असावा असा अंदाज आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे. बाथरुमची खिडकी बंद होती, हवा बाहेर जायला जागा नव्हती त्यामुळे ही घटना घडली असावी. असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
गॅस गीझरमध्ये कार्बन मोनॉक्साईडचं उत्सर्जन काही प्रमाणात होऊ शकतं. हा वायू रंगहीन आणि गंधहीन असतो. व्हेंटिलेशन व्यवस्थित नसेल तर अशा घटना घडू शकतात असंही पोलिसांनी सांगितलं आहे.