खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं ‘भारत जोडो’ यात्रेचं आयोजन केलं आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही पदयात्रा काढण्यात आली आहे. आता ही यात्रा महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशाच्या सीमेवर पोहोचली आहे. काँग्रेसच्या या पदयात्रेला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र सोशल मीडियात निर्माण झालं आहे.
अशी एकंदरीत स्थिती असताना बंगळुरू येथील न्यायालयानं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. भारत जोडो यात्रेतील व्हिडीओजमध्ये ‘केजीएफ-२’ चित्रपटातील संगित वापरल्याने न्यायालयाने ‘काँग्रेस पक्ष’ आणि ‘भारत जोडो’ यात्रेची ट्विटर खाती ब्लॉक करण्याचा आदेश दिला आहे. तात्पुरत्या काळासाठी ही खाती ब्लॉक करण्यात यावीत, असं न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. याबाबतचं वृत्त ‘इकोनॉमिक टाइम्स’ने दिलं आहे.
‘एमआरटी म्युझिक’ कंपनीने काँग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनाटे यांच्याविरोधात यशवंतपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. काँग्रेसने ‘केजीएफ-२’ या चित्रपटातील संगीत बेकायदेशीरपणे वापरल्याचा (कॉपीराईट) आरोप कंपनीने केला होता. याप्रकरणी यशवंतपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेसने बेकायदेशीरपणे चित्रपटातील संगीत वापरल्याचं प्रथमदर्शनी न्यायालयाच्या निदर्शनास आलं आहे.
एमआरटी कंपनीने न्यायालयात सादर केलेले पुरावे आणि युक्तीवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने काँग्रेस पक्ष आणि भारत जोडो यात्रेची ट्विटर खाती ब्लॉक करण्याचे आदेश ट्विटर कंपनीला दिले आहेत. ट्विटरने आपल्या प्लॅटफॉर्मवरून संबंधित तीन लिंक काढून टाकाव्यात, असंही न्यायालयाने आदेशात म्हटलं आहे.