Carry Bag Charge: मॉल किंवा मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये खरेदी केल्यानंतर सामान नेण्यासाठी पिशव्या देताना पैसे आकारले जातात. कागदी किंवा कापडी पिशव्यांसाठी पैसे आकारून या पिशव्या दिल्या जातात. मात्र बंगळुरूमधील टोनिक ब्रँडला पिशव्यांसाठी पैसे आकारणे चांगलेच महागात पडले आहे. विविध प्रकारचे मद्यविक्री करणाऱ्या टोनिकचे देशभरातील अनेक शहरात मोठमोठी दुकाने आहेत. ग्राहक मंचाने टोनिक स्टोअरला एक लाखांचा दंड ठोठावला आहे. तर ज्या ग्राहकाने तक्रार केली, त्याला ५,००० रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. ग्राहक मंचाचा हा निर्णय देशभरातील ग्राहकांना दिलासा देणारा आहेच, त्याशिवाय खरेदी करताना सजगता बाळगणे किती गरजेचे आहे, याचाही प्रत्यय यातून येत आहे.

प्रकरण काय आहे?

मद्य खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या टोनिक स्टोअरमधून प्रवीण बी. (वय ३१) यांनी खरेदी केली होती. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रवीण यांनी टोनिकमधून १,५८५ रुपयांची खरेदी केली. मात्र या वस्तूंसाठी पिशवी मोफत न देता त्यासाठी १४.२९ रुपये आकारले. या पिशवीवर टोनिक ब्रँडची जाहिरात होती, तसेच स्टोअरचा पत्ताही दिला होता. पिशवीच्या माध्यमातून जाहिरात करूनही यासाठी पैसे का आकारले जात आहेत? असा प्रश्न प्रवीण यांनी विचारला. तसेच याविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार केली.

प्रवीण यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, टोनिकने पिशव्यांवर जाहिरातबाजी करून व्यवसायाची चुकीची पद्धत अवलंबली आहे. तसेच सेवा देण्यात कुचराई केली आहे. प्रवीण यांचा युक्तिवाद ग्राहक मंचाने योग्य असल्याचा सांगितला. जर दुकानदार त्यांच्या दुकानाची जाहिरात पिशवीच्या माध्यमातून करत असतील तर त्यांनी ग्राहकांना पिशव्या मोफत दिल्या पाहिजेत, असा निर्णय दिला.

टोनिकने या युक्तिवादाचा बचाव करताना म्हटले की, ग्राहकाने स्वेच्छेने पिशवी मागितली होती तसेच यासाठी शुल्क लागणार असल्याचीही माहिती त्यांना दिली होती. तसेच ग्राहकाने घरूनच पिशवी आणायला हवी होती किंवा वस्तू हातात नेण्याचा पर्याय त्यांच्याकडे होता, असेही टोनिकने आपल्या बचावात म्हटले.

टोनिकचा हा बचाव ग्राहक मंचाने फेटाळून लावला. सदर बचाव अव्यवहारिक आणि अन्यायकारक आहे, अशा शब्दात मंचाने फटकारले. ज्या पिशवीच्या माध्यमातून आपलीच जाहिरात होत आहे, त्यासाठी पैसे आकारणे ही व्यापाराची चुकीची पद्धत आहे. त्यामुळेच टोनिकला ग्राहक कल्याण निधीसाठी १ लाख रुपये, खटल्याच्या खर्चापोटी प्रवीण यांना ५,००० रुपये आणि पिशवीसाठी घेतलेले १४.२९ रुपये परत देण्याचा निर्णय दिला.