Bengaluru Crime News : दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखी घटना बंगळुरूमध्ये घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिलेची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तब्बल ३० तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. खून झालेल्या महिलेचे नाव महालक्ष्मी असं होतं. बंगळुरूच्या व्यालिकवल परिसरात शनिवारी (दि.२१ सप्टेंबर) ही घटना उघडकीस आली. पोलिसांच्या माहितीनुसार, सदर खून १५ दिवसांपूर्वीच झाला असून महालक्ष्मीच्या शरीराचे तुकडे करून १६५ लीटरच्या फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते.
या घटनेबाबत खून झालेल्या महिलेच्या आईने धक्कादायक माहिती सांगितल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. खून झालेल्या महिलेच्या आईने सांगितलं की, “माझ्या मुलीच्या घरमालकाने आम्हाला रात्री फोन केला आणि सांगितले की घरातून दुर्गंधी येत आहे. माझ्या मुलीच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रिजमध्ये भरले होते.”
हेही वाचा : श्रद्धा वालकर हत्याकाडांची पुनरावृत्ती; फ्रीजमध्ये आढळले महिलेच्या शरीराचे २० तुकडे, कुठे घडली घटना?
दरम्यान, महालक्ष्मी बेंगळुरूमधील व्यालिकवल भागात एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. ती विवाहित होती पण पतीपासून वेगळी राहत होती. रिपोर्टनुसार, घटनेची माहिती मिळताच तिचा पतीही घटनास्थळी दाखल झाला. हा खून काही दिवसांपूर्वीच झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर आज सकाळी पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
तपासासाठी पोलिसांची आठ विशेष पथके
वृत्तानुसार, या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी आठ विशेष पथके तयार केली आहेत. पोलीस ही घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करत आहेत. दरम्यान, या घटनेतील गुन्हेगाराला अद्याप अटक झालेली नाही, आरोपींचा शोध सुरु आहे. मात्र, या घटनेमुळे बेंगळुरूमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी वरिष्ठ पोलिसांनी दाखल होत तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आहेत.
मॉलमध्ये करत होती काम
महालक्ष्मी असे या खून झालेल्या महिलेचे नाव असून ती तिच्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर सुमारे पाच महिने तेथे एकटीच राहत होती. या क्षेत्राची तपासणी करण्यासाठी आणि तपास सुरू करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार ही महिला एका मॉलमध्ये काम करत होती. तिच्या हत्येचा सुगावा मिळण्यासाठी पोलिसांकडून तिच्या सहकर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे.