कर्नाटकमधल्या बंगळुरु या ठिकाणी लेआऊट पोलीस ठाण्यासमोर एक ऑटो रिक्षा येऊन थांबली. एक महिला त्या रिक्षातून बाहेर आली. तिच्या हातात निळ्या रंगाची एक ट्रॉली बॅग होती. महिला ही बॅग घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहचली. पोलिसांना वाटलं की या महिलेला एखादी FIR दाखल करायची असेल. मात्र महिलेने पोलिसांना सांगितलं की तिचं नाव सोनाली सेन आहे. ती एक फिजिओ थेरेपिस्ट आहे. तिने त्यानंतर पोलिसांना हे सांगितलं की तिने तिच्या आईची हत्या केली आहे.
पोलिसांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्यांना वाटलं की या महिलेचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. मात्र महिलेने पुन्हा एकदा पोलिसांना सांगितलं की तिने आईची हत्या केली आहे आणि आईचा मृतदेह बॅगेत ठेवला आहे. हे ऐकताच पोलिसांनी सोनालीला बॅग उघडायला सांगितली त्यात खरोखरच एका वृद्ध महिलेचा मृतदेह होता. हात आणि पाय मुडपून हा मृतदेह बॅगेत ठेवण्यात आला होता. तसंच एका वृद्ध व्यक्तीचा फोटोही त्यात होता. सोनालीने सांगितलं की हा तिच्या वडिलांचा फोटो आहे. माझी आई मला वारंवार सांगत होती की तू मला मारुन टाक त्यामुळे मी तिची हत्या केली असं या मुलीने सांगितलं आहे. सोनालीचं हे म्हणणं ऐकून पोलीसही चक्रावले. त्यानंतर त्यांना सोनालीने नेमकं काय घडलं ते सांगितलं.
सोनालीने पोलिसांना काय सांगितलं?
सोनालीने पोलिसांना सांगितलं की मी पश्चिम बंगालची राहणारी आहे आणि माझं वय ३९ आहे. मी माझ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. लग्नानंतर मी बंगळुरुला आले. माझ्या सासरी माझे पती, सासूबाई राहतात. माझे आई-वडील कोलकातामध्ये राहात होते. काही वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचं आजारपणामुळे निधन झालं. त्यानंतर माझी आई एकटी पडली. आईची काळजी आणि देखभाल करणारं कुणीच नव्हतं. त्यामुळे मी आईला माझ्या सासरी म्हणजेच बंगळुरुमध्ये आणलं. सुरुवातीचे काही दिवस सगळं काही व्यवस्थित सुरु होतं मात्र काही दिवसांनी माझी आई आणि माझी सासू यांच्यात वाद आणि भांडणं होऊ लागली. रोज होणाऱ्या भांडणांना सोनाली कंटाळली त्यामुळे तिने नोकरीही सोडली होती. मात्र तिची आई आणि तिची सासू यांच्यातले वाद काही कमी झाले नाहीत. रविवारीही एका क्षुल्लक कारणावरुन माझी आणि सासू यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर सोनालीने आणि तिच्या पतीने या दोघींना कसंबसं समजावलं.
सोनालीने सांगितलं की त्यादिवशी मी माझ्या आईला समजावलं आणि माझ्या नवऱ्याने त्याच्या आईला. त्यावेळी मला आई म्हणाली की तू मला मारुन टाक, म्हणजे तुझं आयुष्य सुरळीत चालेल. त्यानंतर सोनालीने आईला समजावलं की असं बोलायचं नाही. तो दिवस निघाला पण सोमवार उजाडला तेव्हा तिच्या आईचं आणि सासूचं परत भांडण सुरु झालं. सोनालीचा नवरा कामावर गेला होता. सोनालीने कसंबसं या दोघींचं भांडण मिटवलं.
सोनालीने आईची हत्या कशी केली?
सोनालीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (१२ जून) जेव्हा आई आणि सासू या दोघींमध्ये वाद झाला तेव्हा सोनालीने सासूला वेगळ्या खोलीत जायला सांगितलं आणि आईला ती तिच्या खोलीत घेऊन आली. त्यानंतर आईने तिला सांगायला सुरुवात केली की तू मला मारुन टाक म्हणजे तुझा संसार सुरळीत चालेल. त्यानंतर सोनालीने आईला झोपेच्या बऱ्याच गोळ्या खाऊ घातल्या. तिच्या आईने गोळ्या घ्यायला विरोध दर्शवला नाही. मात्र गोळ्या घेतल्यावर त्या तडफडू लागल्या. सोनालीला आईची ती अवस्था बघवली नाही म्हणून तिने गळा दाबून आईची हत्या केली. आज तकने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
सासू आणि पतीला काहीही ठाऊक नाही
सोनालीने सांगितलं की या सगळ्या घटनेबाबत माझ्या सासूला किंवा पतीला काहीही कल्पना नाही. कारण ही घटना जेव्हा घडली तेव्हा माझा पती कामावर गेला होता आणि सासू घरातल्या दुसऱ्या खोलीत होती. सोनालीने जे सांगितलं त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. सध्या तिची चौकशी करण्यात येते आहे आणि तिच्या आईचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या हत्येमागे नेमकं कारण काय आहे? सोनालीने तिच्या आईची इच्छा पूर्ण केली? की सासू आणि आईमध्ये होणारी रोजची भांडणं संपवण्यासाठी सोनालीने हे टोकाचं पाऊल उचललं? पोलीस या अनुषंगाने तपास करत आहेत.