बंगळुरुमधील वाहतूक कोंडी हा सोशल नेटवर्किंगवर कायमच चर्चेचा विषय असतो. अगदी मिम्सपासून ते टोले, टोमण्यांपर्यंत अनेक गोष्टी या वाहतूक कोंडीच्या माध्यमातून सोशल मीडियावर पहायला मिळतात. मात्र मागील काही काळापासून या वाहतूक कोंडीने नवीनच समस्या निर्माण केली असून अत्यावस्थ रुग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यासाठीही यामुळे अडचणी निर्माण होत असल्याचं निदर्शनास आलं आहे.
३० ऑगस्ट रोजी असाच एक प्रकार घडला. मनिपाल रुग्णालयामधील ग्रॅस्ट्रोंएन्ट्रोलॉजिस्ट असणारे डॉक्टर गोविंद नंदकुमार हे वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडले. सर्जापूर-मराठाहाली मार्गावर नंदकुमार हे वाहतूक कोंडीत अडकले जेव्हा ते एका रुग्णावर महत्त्वाची शस्त्रक्रीया करण्यासाठी निघाले होते.
डॉ. नंदकुमार यांच्या नियोजित शस्त्रक्रीयांपैकी पहिल्या रुग्णाची शस्त्रक्रीया झाल्यानंतर अन्य दोन रुग्णांवरही ते शस्त्रक्रीया करणार होते. मात्र नंदकुमार यांची गाडी वाहतूक कोंडीत अडकली. अखेर रुग्णालयापासून तीन किलोमीटवर असताना नंदकुमार हे गाडीतून उतरले आणि रुग्णालयाच्या दिशेने धावू लागले. हा सर्व प्रसंग त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सविस्तरपणे सांगितला आहे.
“कनिंगहम मार्गावरुन मला सर्जापूरमधील मनिपाल रुग्णालयामध्ये पोहचायचं होतं. मात्र भरपूर पाऊस पडल्याने जागोजागी पाणी साचलं होतं. त्यामुळे वाहतूक कोंडीही झाली होती. रुग्णालयासमोरच काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रागा होत्या,” असं नंदकुमार म्हणाले. वाहतूक कोंडी लवकर सुटणार नाही हे लक्षात आलं. त्यामुळेच नंदकुमार यांनी गाडीतून उतरुन धावत रुग्णालय गाठण्याचा निर्णय घेतला. “वाहतूक कोंडी सुटेल याची अधिक वाट पाहण्यात अर्थ नाही हे मला जाणवं. त्यात माझ्या रुग्णांना शस्त्रक्रीया झाल्याशिवाय जेवणं दिलं जाणार नव्हतं. त्यांनी माझ्यासाठी जास्त काळ वाट पहावी असं मला वाटतं नव्हतं. म्हणून मी गाडी सोडण्याचा निर्णय घेतला,” असं डॉक्टर म्हणाले. ४५ मिनिटांमध्ये डॉक्टरांनी तीन किमीचं अंतर कापत रुग्णालय गाठलं आणि नियोजित शस्त्रक्रीया केल्या.
मागील १८ वर्षांपासून डॉ. नंदकुमार हे शस्त्रक्रीया करत आहेत. आतापर्यंत त्यांनी एक हजाराहून अधिक रुग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रीया केल्या आहेत. अन्ननलिका आणि त्यासंदर्भातील आजारांचे ते स्पेशॅलिस्ट आहेत.