कर्नाटकमधील बंगळुरू येथे मंगळवारी एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथील एका आयटी कंपनीतील एमडी आणि सीईओची कार्यालयात घुसून हत्या करण्यात आली आहे. आरोपीने हातात तलवार आणि चाकू घेऊन कार्यालयात प्रवेश केला आणि दोघांची हत्या केली. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी याच कंपनीचा माजी कर्मचारी असल्याचं बोललं जात आहे.
फणींद्र सुब्रमण्यम आणि विनू कुमार असं हत्या झालेल्या दोघांची नावं आहेत. फणींद्र सुब्रमण्यम हे ‘एरोनिक्स इंटरनेट कंपनी’चे एमडी होते. तर विनू कुमार हे याच कंपनीचे सीईओ होते. बेंगळुरूमधील अमृतहल्लीजवळ ही दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, या दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी हा ‘एरोनिक्स इंटरनेट कंपनी’चा माजी कर्मचारी आहे. संशयिताने कंपनी सोडल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता. तथापि, आरोपीचा मृत एमडी फणींद्र सुब्रमण्यम यांच्यावर तीव्र राग होता. सुब्रमण्यम यांनी आरोपीच्या उद्योग चालवण्याच्या पद्धतीचा विरोध केला होता. याच रागातून ही हत्या केल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा- तोंडाला रुमाल आणि हातात ‘कटर’ घेत दुकानात केला प्रवेश, सिनेस्टाइल दरोड्याचा VIDEO व्हायरल
आज (मंगळवार) दुपारी चारच्या सुमारास संशयित आरोपी तलवार आणि चाकू घेऊन ‘एरोनिक्स’च्या कार्यालयात घुसला होता. यावेळी त्याने फणींद्र सुब्रमण्यम आणि विनू कुमार यांना भोसकलं आणि घटनास्थळावरु पळ काढला. जखमींना रुग्णालयात घेऊन जाताना दोघांचाही मृत्यू झाला आहे.