Bengaluru Crime News : बंगळुरूमध्ये नुकतेच एका जोडप्याने आपल्या दिव्यांग मुलीसह मुलाला विष पाजत आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास पोलीसांनी सुरू केला असून, मालमत्तेशी संबंधित फसवणूक आणि त्यांच्या मुलीच्या अपंगत्वामुळे या जोडप्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान अनुप कुमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी भावाला पाठवलेल्या ई-मेलमध्ये कठीण काळात आई-वडिलांनी मदत न केल्याचे नमूद केले आहे.
अनुप कुमार (३८), पत्नी राखी (३५), त्यांची पाच वर्षांची मुलगी आणि दोन वर्षांचा मुलगा सोमवारी सकाळी बंगळुरूमधील आरएमव्ही सेकंड स्टेज परिसरात एका भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळले. हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे आहे. सॉफ्टवेअर सल्लागार म्हणून काम करणाऱ्या अनुप कुमार यांनी ४५ दिवसांपूर्वी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. तर, त्यांच्या पत्नी राखी गृहिणी होत्या. दरम्यान काही अडचणींमुळे अनुप कुमार पुण्याला स्थलांतरित होण्याचा विचार करत होते. पण, त्यापूर्वी त्यांनी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले.
आई-वडिलांनी दुर्लक्ष केले
या प्रकरणावर बोलताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “अनुप कुमार आणि त्याच्या पत्नीने आत्महत्या करण्यापूर्वी सुरुवातीला आपल्या मुलांना मारले किंवा विष दिले असावे. प्राथमिक तपासात आम्हाला असे दिसून आले की, अनुप कुमार यांनी आपल्या भावाला ईमेल पाठवून ते हे टोकाचे पाऊल का उचलत आहेत, त्याबद्दल माहिती दिली होती. या मेलमध्ये अनुप कुमार यांनी कठीण काळात आई-वडिलांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचेही नमूद केले आहे.”
आर्थिक संकट
बंगळुरू पोलिसांना या प्रकरणाचा तपास करताना अढळले की, आत्महत्या करणारे अनुप कुमार हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात होते. पोलिसांनी पुढे सांगितले की, “सोमवारी सकाळी अनुप कुमार यांच्याकडे काम करणाऱ्या महिलेने त्यांच्या घराची बेल वाजवली तेव्हा कोणीही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर तिने दार ठोठावण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते उघडेच असल्याचे लक्षात आल्यानंतर ती आत गेली. तेव्हा तिला अनुम कुमार यांचा मृतदेह दिसला, त्यानंतर तिने शेजारी आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.
हे ही वाचा : “तुमच्या पोस्ट्समुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो”, TED Talks च्या प्रमुखांनी एलॉन मस्क यांना फटकारले
दिव्यांग मुलगी आणि फसवूक
अनुप कुमार यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असलेल्या चंद्रिका या महिलने या प्रकरणावर बोलताना सांगितले की, “गेल्या दोन वर्षांपासून अनुप कुमार या भाड्याच्या घरात राहत होते. त्यांची मुलगी दिव्यांग होती. त्याचबरोबर जमिनीच्या एका प्रकरणात अनुप यांची फसवणूक झाली होती. त्यामुळे गेल्या पाच-सहा वर्षांपासून कायदेशीर लढाई सुरू होती. त्यांनी शुक्रवारी मला फोन केला होता पण त्यांच्या बोलण्यातून, ते असे काही करतील वाटले नव्हते.”