Ganesh Visarjan 2024: देशभरात सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. १० दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, काही ठिकाणी दीड दिवसाचा तर काही ठिकाणी तीन दिवस आणि काही ठिकाणी पाच व सात दिवसांचा गणपती बसवला जातो. गणपतीची पूजा केल्यानंतर गणेश विसर्जन केले जाते. आता पाच दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले आहे. पाच दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करत असताना बेंगळुरूमध्ये एक वेगळी घटना घडल्याचं पाहायला मिळालं आहे. गणपती बाप्पाचे विसर्जन करताना तब्बल चार लाख रुपयांची ६० ग्रॅम सोन्याच्या साखळीसह गणपती बाप्पाचे विसर्जन केल्याचा प्रकार समोर आला आहे.
नेमकी काय घडलं?
बेंगळुरूमध्ये एका कुटुंबाने मोठ्या उत्साहात पाच दिवसांचा गणपची बसवला. यावेळी गणपतीच्या सजावटीसाठी या कुटुंबाने तब्बल चार लाख रुपयांची ६० ग्रॅम सोन्याची साखळी आणली होती. या चार लाख रुपयांच्या सोन्याच्या साखळीने गणेश मूर्तीची सजावट त्यांनी केली होती. यानंतर पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मात्र, गणपतीचे विसर्जन करत असताना हे कुटुंबीय ती साखळी काढण्यास विसरले आणि त्यांनी गणेश मूर्तीचे विसर्जन केले. गणपती विसर्जनानंतर साखळी काढण्यास विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांना धक्का बसला.
हेही वाचा : Hyderabad : धक्कादायक! रुग्णाच्या नातेवाईकाकडून महिला डॉक्टरवर हल्ला; घटनेचा व्हिडीओ व्हायरल, आरोपीला अटक
मग काय लगेचच साखळीचा शोध सुरु केला. गणपतीचे विसर्जन केले त्याठिकाणी साखळीचा शोध घेण्यासाठी ते कुटुंबीय पोहोचलं. मात्र, संबंधित ठेकेदाराने पाणी उपसण्यास नकार दिला. त्यानंतर त्या कुटुंबाने पोलिसांत धाव घेतली. यानंतर प्रशासनाच्या मदतीने साखळीचा शोध घेण्यास सुरुवात झाली. तब्बल १० तास हे कुटुंबीय साखळीचा शोध घेत होते. या साखळीच्या शोधासाठी १० हजार लिटर पाणी बाहेर काढण्यात आलं. यासाठी कंत्राटदाराने आपल्या मुलांना साखळी शोधण्यासाठी कामाला लावलं होतं. त्यानंतर अखेर ही साखळी सापडली. आणि बेंगळुरूच्या गोविंदराजनगर येथील या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.