मुलांचं वाढतं मोबाइलचं व्यसन अनेक पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मोठ्या मेहनतीनं मुलांचा शाळेचा खर्च उचलायचा, त्यांना हवं ते आणून द्यायचं आणि मुलं जर मोबाइलमध्ये डोकं घालून अभ्यासात दुर्लक्ष करत असतील तर पालकांची डोकेदुखी वाढते. बंगळुरूमध्ये अशाच एका त्रासलेल्या वडिलांनी थेट मुलाचा खून केला. आपला मुलगा सतत मोबाइलमध्ये असतो. शाळेत जात नाही, तसेच वाईट संगत सोडत नाही, म्हणून बंगळुरूचा रवी कुमार आणि त्याचा १४ वर्षांचा मुलगा तेजस यात तणाव निर्माण झाला होता. त्यात बिघडलेला मोबाइल दुरुस्त करण्यावरून दि. १५ नोव्हेंबर रोजी दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर संतापलेल्या रवी कुमार यांनी स्वतःच्या मुलाला क्रिकेट बॅटनं जबर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यानं मुलाला भिंतीवर अनेकदा आपटलं. या मारहाणीत १४ वर्षीय तेजसचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आरोपी रवी कुमार सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. ‘तू जगला किंवा मेलास तरी आता मला फरक पडत नाही’, असे वाक्य रवी कुमार मुलाला मारहाण करत असताना म्हणत होता, अशी माहिती समोर आली आहे. मारहाणीनंतर काही वेळाने तेजसचा मृत्यू झाला. पण घरातील लोकांनी त्याची माहिती लपवून ठेवली. अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करून अंत्यसंस्कार करण्याची तयारी करत असताना पोलिसांनी रवी कुमारला अटक करण्यात आली.
बंगळुरूच्या कुमारस्वामी लेआऊट परिसरात मुलाला मारहाण करून त्याचा खून केल्याची गुप्तवार्ता पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना धक्काच बसला. कुटुंबियांनी अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी केली होती. पोलिसांनी मध्यस्थी करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
शवविच्छेदन अहवालातून सत्य समोर
मुलाच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. मृत्यू होण्यापूर्वी त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याची माहितीही यातून मिळाली. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर समजले की, आरोपी रवी कुमार हा सुतारकाम करत होता. त्याचा १४ वर्षीय मुलगा नववीत शिकत होता. मात्र त्याला मोबाइलचे व्यसन होते. यामुळे तो अभ्यासात बिलकुल लक्ष देत नव्हता. ज्यादिवशी ही दुर्दैवी घटना घडली, त्यादिवशी मोबाइल फोन दुरुस्त करण्यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर रवी कुमारने मुलाला मारहाण केली.
सकाळी ८ वाजता मुलाला मारहाण झाल्यानंतर दुपारी २ पर्यंत कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केले नाही. जेव्हा त्याचा श्वासोच्छवास बंद झाला त्यानंतर त्याला घाईघाईने रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
© IE Online Media Services (P) Ltd