Mercedes Benz Accident News: अपघात होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दिवसाला देशभरात अनेक अपघाताच्या घटना घडतात. यामध्ये काहीजण बचावतात तर काही गंभीर जखमी होतात. मात्र काहींना आपला जीव देखील गमवावा लागतो. त्यामुळे रस्त्यावर गाडी चालवताना सरकारकडून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाते. मात्र, काहीजण नियमांचे पालन करतात आणि काहीजण नियम पाळत नाहीत. त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येतं. गेल्या काही महिन्यांत अनेक हिट अँड रनच्याही घटना घडल्या आहेत. आता अशीच एक अपघाताची घटना बेंगळुरूमध्ये घडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका २० वर्षीय मद्यधुंद तरुणाने चालविलेल्या मर्सिडीज कारच्या धडकेमुळे बेंगळुरूतील एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेंगळुरूमधील केंगेरी भागात ही घटना घडली. २० वर्षीय तरुणाने मद्यधुंद अवस्थेत चालवलेल्या भरधाव मर्सिडीज गाडीची एका ३० वर्षीय महिलेला धडक बसली आणि याच धडकेत त्या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मर्सिडीज गाडीच्या ड्रायव्हरने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. यानंतर पोलिसांनी मर्सिडीज गाडीच्या ड्रायव्हरला अटक केली. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

हेही वाचा : VIDEO: “फटाक्यावर बसला तर नवीकोरी रिक्षा घेऊन देऊ”; तरुणाला पैज भारी पडली, मृत्यूचा थरार कॅमेरात कैद

या घटनेबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बेंगळुरूच्या केंगेरीमध्ये शनिवारी संध्याकाळी ३० वर्षीय महिला रस्ता ओलांडत होती. मात्र, याच वेळी भरधाव वेगात असलेल्या मर्सिडीज बेंझ या अलिशान गाडीने जोराची धडक दिली. ही अलिशान गाडी एक २० वर्षीय तरुण चालवत होता. तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती त्यानंतर सांगण्यात आली आहे. तसेच तो तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्यामुळे भीषण अपघात झाला. धनुष असं या मर्सिडीज बेंझ गाडी चालवणाऱ्या तरुणाचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अपघातानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी त्याला पकडले आणि मारहाण केली. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी मर्सिडीज गाडीचा चालक धनुष याला अटक केली. त्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच मर्सिडीज गाडी चालक तरुणाच्या वडिलांची खासगी बस ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, धनुषच्या वडिलांनी नुकतीच ही आलिशान कार खरेदी केली होती. त्यानंतर धनुष ही गाडी घेऊन एका मॉलमध्ये मित्रासोबत पार्टीसाठी गेला होता. त्या ठिकाणी मद्यप्राशन केल्यानंतर ते लाँग ड्राईव्हसाठी निघाला असताना हा अपघात घडला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bengaluru mercedes benz accident news a young man crushed a woman while driving a mercedes in a drunken state the accused arrested gkt