How Techie killed his wife in Bengaluru : दक्षिण बंगळुरूत नोकरीनिमित्त राहणाऱ्या एका मराठी तरुणाने त्याच्या पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. तिची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरून ठेवलं. एका मराठी गाण्यावरून पत्नीने पतीला डिवचलं म्हणून ही हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी संबंधित आरोपी राकेश खेडेकर याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

एका खासगी कंपनीत वरिष्ठ प्रकल्प समन्वयक असलेल्या राकेश खेडेकर याने २६ मार्चच्या रात्री हुलीमावूजवळील दोड्डाकम्मनहल्ली येथील त्यांच्या घरी त्यांची पत्नी गौरी सांब्रेकर (३२) हिची हत्या केली. गौरी नेहमी राकेशच्या पालकांचा आणि धाकट्या बहिणीचा अपमान करत असल्याने तो अस्वस्थ होता, असं त्याने पोलीस चौकशीत सांगितलं.

राकेशने पोलिसांना काय सांगितलं?

राकेशने पोलिसांना सांगितलं, “गौरी नेहमीच माझ्या वडिलांबद्दल, आईबद्दल आणि बहिणीबद्दल वाईट बोलायची. ती घरात आणि बाहेर नेहमीच त्यांचा अपमान करायची. तिने आपल्याला बेंगळुरूला जाऊन नवीन नोकरी शोधण्याचा आणि नवीन आयुष्य सुरू करण्याचा सल्ला दिला. शाळेपासूनच ती माझ्यावर वर्चस्व गाजवत होती. पण मी तिच्या प्रेमात वेडा झालो होतो. बेंगळुरूमध्ये जवळजवळ महिनाभर तिला नोकरी मिळाली नाही म्हणून ती आपल्याला परत मुंबईला जावे अशी तिची इच्छा होती आणि त्यावरून ती अनेकदा वाद घालायची.”

गौरीच्या हत्येचा घटनाक्रम काय?

राकेश आणि गौरी यांनी २६ मार्चच्या संध्याकाळी घरी काही वेळ एकांतात घालवला. नंतर, ते जवळच्या मोकळ्या जागेत फिरायला गेले. घरी परतताना त्यांनी दारू आणि नाश्ता खरेदी केला. ते संध्याकाळी ७.३० च्या सुमारास घरी पोहोचले. राकेश त्याचे काम संपवून दररोज मद्यपान करत असे. गौरी त्याला नाश्ता देत आणि गाणी ऐकत त्याची सोबत करत असे. एकमेकांच्या आवडीनुसार ते आळीपाळीने गाणी वाजवत असत. राकेश मद्यपानाला बसला तेव्हा गौरी भात बनवत होती. राकेशची गाणी ऐकून झाल्यानंतर गाणी लावायची पाळी गौरीची आली. तेव्हा तिने एक मराठी गाणं वाजवलं. या गाण्यामध्ये वडील-मुलाच्या नात्याबद्दल काही टीप्पण्या होत्या. तिने गाण्याने त्याची खिल्ली उडवली. ती त्याच्या चेहऱ्याजवळ गेली, त्याचे मस्करीत गाल फुगवले आणि त्याची चेष्टेत छेड काढत बसली. हे पाहून राकेश चिडला. त्याने तिला रागात स्वयंपाकघराजवळ ढकललं. यामुळे ती प्रचंड रागावली. तिने स्वयंपाकघरातून एक चाकू घेतला आणि शिवीगाळ करत त्याच्यावर फेकला.

रागाच्या भरात राकेशने तोच चाकू घेतला आणि तिच्या मानेवर व एकदा पोटावर वार केला. रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान ही घटना घडली. या हल्ल्यामुळे तिला प्रचंड रक्तस्राव झाला. तरीही तो तिच्या शेजारी बसून राहिला आणि त्याने असं कृत्य का केलं हे सांगत राहिला, असं पोलिसांनी सांगितलं. गौरीने कपडे भरण्यासाठी आणि मुंबईला परत जाण्यासाठी एक सुटकेस रिकामी केली होती. राकेशने तिची नाडी तपासून ती मृत आहे की जीवित हे तपासले. त्यानंतर त्या सुटकेसमध्ये तिचा मृतदेह भरला. परंतु, सुटकेस स्वयंपाकघरातून बाथरुमकडे नेत असताना सुटकेसचे हँडल तुटले. त्यामुळे त्याने सुटकेस बाहेर घेऊन न जाता घरातच ठेवला. तिथून तो रात्री १२.४५ च्या सुमारास निघाला. घराला कुलूप लावले अन् थेट महाराष्ट्रातील शिरवळ येथे पोहोचला. दरम्यान, त्याने त्याच्या या कृत्याची गौरीच्या भावाला कल्पना दिली होती. त्यामुळे तो महाराष्ट्रात येताच पोलिसांनी त्याला पकडलं.