Bengaluru Mahalaxmi Murder Case बंगळुरु या ठिकाणी श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं पाहण्यास मिळालं. एका घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येऊ लागली. ज्यानंतर शेजाऱ्यांनी या घरात राहणाऱ्या महालक्ष्मीच्या आई आणि बहिणीला ही माहिती दिली. त्यांनी घरी येऊन पाहिलं तेव्हा त्या घरात सगळीकडे किडे झाले होते. तसंच फ्रिजमध्ये महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे ( Bengaluru Murder ) होते. हे पाहून महालक्ष्मीची आई आणि बहीण दोघीही गर्भगळित झाल्या. आता यानंतर माध्यमांशी बोलताना महालक्ष्मीच्या आईने नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे.
कलम १०३ च्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे
बंगळुरु पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला आहे. कलम १०३ च्या अंतर्गत महालक्ष्मीच्या हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महालक्ष्मी या २९ वर्षीय महिलेचा मृतदेह २० हून अधिक तुकड्यांमध्ये तिच्या राहत्या घरी आढळून आला. तिच्या घरातल्या फ्रिजमध्ये तिच्या मृतदेहाचे तुकडे ठेवले होते. महालक्ष्मी ही तिच्या घरात एकटीच राहात होती तसंच फॅशन फॅक्टरीमध्ये ती टीम लीडर म्हणून काम करत होती.
हे पण वाचा- श्रद्धा वालकर हत्याकाडांची पुनरावृत्ती; फ्रीजमध्ये आढळले महिलेच्या शरीराचे २० तुकडे, कुठे घडली घटना?
FIR मध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
महालक्ष्मीची आई मीना राणा यांनी दिलेल्या जबाबानुसार त्यांना या घरातून दुर्गंध आल्याचं समजलं आणि त्यानंतर ही हत्या उघडकीस आली. महालक्ष्मीच्या शेजाऱ्यांनी तिच्या घरातून दुर्गंध येऊ लागल्याने तिची आई मीना राणा यांच्याशी संपर्क केला. मीना राणा आणि त्यांचे पती हे दोघंही मूळचे नेपाळचे आहेत. ३५ वर्षांपूर्वी ते बंगळुरुत स्थायिक झाले. या दोघांना महालक्ष्मीशिवाय लक्ष्मी, उक्कुम सिंग आणि नरेश अशी तीन मुलं आहेत. त्यापैकी महालक्ष्मीची हत्या झाली आहे. महालक्ष्मी आणि हेमंत दास या दोघांचं लग्न झालं. मात्र दोघांमध्ये मतभेद झाल्याने ते एकमेकांपासून वेगळे झाले. ऑक्टोबर २०२३ पासून महालक्ष्मी आणि तिचा पती वेगळे राहात आहेत अशी माहितीही मीना राणा यांनी पोलिसांना दिली.
महालक्ष्मी आणि तिच्या भावाचा वाद
महालक्ष्मी विभक्त झाल्यानंतर वेगळ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली. त्यावेळी तिचा भाऊ उक्कुम सिंग आणि त्याची पत्नी दीपिका हे दोघंजण तिच्या बरोबर १५ दिवस राहिले होते. मात्र या दोघांचा महालक्ष्मीशी वाद झाला आणि नंतर हे दोघंही मराठहल्ली या ठिकाणी राहण्यास गेले.मीना राणा यांनी सांगितलं आहे की मी माझ्या मुलीकडे बऱ्याचदा जायचे. ती बरी आहे ना? तिची काळजी ती घेते आहे ना? हे मी बघायचे. मात्र त्या दिवशी तिच्या भावाला म्हणजेच उक्कुम सिंगला कुणीतरी सांगितलं की महालक्ष्मीच्या घरातून दुर्गंधी येते आहे. त्याने आम्हाला कळवलं. पण तेव्हा संध्याकाळचे ७ वाजून गेले होते. त्यामुळे आम्ही विचार केला की आज ऐवजी उद्या जाऊ. शनिवारी म्हणजेच २१ सप्टेंबरला आम्ही महालक्ष्मीच्या घरी गेलो तेव्हा दार बाहेरुन बंद होतं. अशी माहितीही मीना राणा यांनी पोलिसांना दिली.
मीना राणांनी सांगितला धक्कादायक अनुभव
मीना राणा म्हणाल्या, महालक्ष्मीच्या घराचं दार बंद होतं आणि दुर्गंधी येत होती. त्यामुळे आम्ही शेजाऱ्यांकडून घराची किल्ली घेतली. किल्लीने दार उघडून जेव्हा घरात प्रवेश केला तेव्हा आम्हाला धक्काच बसला. कारण कपडे, चप्पल, बॅग सगळं काही हॉलमध्ये पडलेलं होतं. तसंच फ्रिजजवळ काही किडे झाले होते. आम्ही फ्रिज उघडला त्यातले तुकडे ( Bengaluru Murder ) पाहून मला प्रचंड धक्का बसला. मी तो प्रसंग कधी विसरुच शकत नाही. आम्ही यानंतर आमच्या जावयाला म्हणजेच इम्रानला (लक्ष्मीचा पती) ही घटना सांगितली. असं मीना राणा यांनी स्पष्ट केलं. मीना राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार २ सप्टेंबरला त्यांचं महालक्ष्मीशी बोलणं झालं. मी माझ्या नवऱ्याकडे जाणार आहे असं तिने मला सांगितलं होतं. आमच्यातलं ते संभाषण शेवटचं ठरलं असंही मीना राणा यांनी म्हटलं आहे.