Atul Subhash suicide case: बंगळुरू येथे नोकरी करणाऱ्या अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी दीड तासाचा व्हिडीओ आणि २४ पानी सुसाईड नोटमध्ये त्यांनी असा दावा केला होता. त्यानंतर त्यांची पत्नी निकिता सिंघानिया आणि तिचे कुटुंबिय फरार झाले होते. रविवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली आहे. बंगळुरू पोलिसांनी पत्नीला गुरुग्राम येथून तर आई निशा सिंघानिया आणि भाऊ अनुराग सिंघानिया यांना प्रयागराज येथून ताब्यात घेतले.
निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबियांना बंगळुरू पोलिसांनी शुक्रवारी नोटीस बजावून तीन दिवसांत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानंतर सिंघानिया कुटुंबियांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अंतरिम जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. आता तिघांची अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त शिवकुमार यांनी दिली.
अतुल सुभाष यांनी चित्रित केलेला व्हिडीओ आणि सुसाइड नोटची न्यायवैधक प्रयोगशाळेत तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येत आहे. तसेच अतुल सुभाष यांचा भाऊ विकास कुमार यांच्या तक्रारीनंतर बंगळुरू पोलिसांनी सिंघानिया कुटुंबियांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. यामध्ये निकिता सिंघानिया आरोपी क्र. १, त्यांची आई निशा आरोपी क्र. २ आणि भाऊ अनुराग आरोपी क्र. ३ आहे.
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण काय आहे?
बंगळुरूमधील ऑटोमोबाइल कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या ३४ वर्षीय अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून सोमवारी (९ डिसेंबर) आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी ८१ मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून २४ पानांची सुसाइड नोट लिहिली आहे. या नोटमध्ये त्यांनी आपल्या शेवटच्या १२ इच्छा व्यक्त केल्या आहेत. अतुल सुभाष यांच्यावर त्यांच्या पत्नीने नऊ गुन्हे दाखल केले होते. न्यायालयीन प्रक्रियेला कंटाळून अतुल सुभाष यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.
अतुल सुभाष हे मुळचे उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहेत. त्यांनी २०१९ साली सॉफ्टवेअर प्रोफेशनल असलेल्या निकिता यांच्याशी विवाह केला होता. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर ते वेगळे झाले होते. सुभाष यांच्याविरोधात खून, हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार अशा प्रकारचे नऊ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील काही गुन्ह्यात अतुल सुभाष यांच्या कुटुंबियांचीही नावे दाखल झाली होती. सुभाष यांनी आत्महत्या करण्यापूर्वी २४ पानांची सुसाइड नोट लिहिली आहे. तसेच ८१ मिनिटांचा व्हिडीओही तयार केला. तसेच उत्तर प्रदेशच्या कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीशांनी पत्नीची बाजू घेतल्याचाही आरोप अतुल सुभाष यांनी लावलेला आहे.