Cash for Intimacy Charge: बंगळुरूमधील एका सॉफ्टवेअर अभियंत्याने त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप केला आहे. शरीर संबंध ठेवण्यासाठी पत्नी पैशांची मागणी करते, अशी तक्रार पतीने दाखल केली आहे. तर पत्नीनेही पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. सदर पतीने बंगळुरूच्या व्यालिकवल पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात तक्रार दाखल केली असून पत्नीवर मानसिक आणि शारीरिक छळवणुकीचा आरोप केला आहे.

लग्नाआधी साडे तीन लाख दिले

पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, श्रीकांत आणि बिंदुश्री यांचे ऑगस्ट २०२२ मध्ये लग्न झाले होते. लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावरून दोघांची ओळख झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीकांतने आरोप केला की, लग्न होण्याच्या आधीच सासूने त्याच्याकडे पैसे मागितले होते. श्रीकांतने केलेल्या दाव्यानुसार, त्याने सासूच्या अकाऊंटमध्ये तीन लाख रुपये पाठवले होते. तसेच लग्नात खर्चासाठी ५० हजार रुपयेही दिले होते.

श्रीकांतने तक्रारीत पुढे म्हटले की, लग्नाला दोन वर्ष होऊनही पत्नी शरीर संबंध ठेवण्यास नकार देत होती. जर शरीर संबंध ठेवायचे असतील तर दररोजचे पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे पत्नीने सांगितल्याचा आरोप पतीने केला आहे.

श्रीकांत जेव्हा जेव्हा पत्नीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा तेव्हा पत्नी चिठ्ठीत त्याचे नाव लिहून आत्महत्या करण्याची धमकी द्यायची. तसेच माझ्या गुप्तांगाला जखम करून माझी हत्या करण्याचा प्रयत्नही केला, असाही आरोप श्रीकांतने तक्रारीत केला आहे.

श्रीकांतने पुढे म्हटले की, पत्नी आणि तिच्या कुटुंबाने माझ्याकडून प्रति महिना ७५ हजार रुपयांची मागमी केली होती. बिंदुश्री आणि तिच्या आईने घर घेतले होते. या घराचा हप्ता त्यांना माझ्याकडून घेतलेल्या पैशातून भरायचा होता.

पत्नीमुळे गमवावी लागली नोकरी

श्रीकांतने पत्नीचा आणखी एक विचित्र प्रकार तक्रारीत कथन केला आहे. घरून काम करत असताना जेव्हा श्रीकांत ऑफिसच्या मीटिंगमध्ये असायचा तेव्हा पत्नी जाणूनबुजून वाद घालायची किंवा स्क्रिनसमोर येऊन नृत्य करायची. यामुळे त्याला नोकरी गमवावी लागली. या प्रकाराचा पुरावा असावा म्हणून श्रीकांतने या विचित्र चाळ्याचे व्हिडीओ चित्रीत केले असल्याचे सांगितले.

पत्नीच्या वर्तनाला कंटाळून श्रीकांतने तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. मात्र पत्नीने तडजोडीसाठी ४५ लाख रुपयांची मागणी केली.

पत्नीकडूनही कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप

श्रीकांतने पत्नीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पत्नीनेही पती आणि त्याच्या कुटुंबियांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. लग्नानंतर माझा हुंड्यासाठी छळ झाला. मला मोलकरणीसारखे वागवले गेले, माझा शारिरिक छळ झाला, असा आरोप पत्नीने केला आहे. तसेच सासरच्या लोकांनी आमच्या बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा सल्ला दिला होता, असाही आरोप पत्नीने केला.

पत्नीने आपल्या तक्रारीत पुढे म्हटले की, पतीच्या भावाने मला गर्भवती करण्यासाठी पतीला सांगितले होते. हीला गर्भवती कर, म्हणजे ही सोडून जाणार नाही, असे तो पतीला म्हणाला.

पती-पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आता दोघांनाही चौकशीसाठी बोलावले आहे. श्रीकांतने सांगितले की, एका मानसोपचारतज्ज्ञाने दोघांना परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला होता. ज्याल पत्नीनेही सहमती दर्शवली होती.