Parliament Securtiy Breach : संसदेतील घुसखोरीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी दोघांना ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी साई कृष्णा हा कर्नाटकातील बागलकोट येथील निवृत्त माजी पोलीस उपअधिकाक्षकांचा मुलगा आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

संसदेत घुसखोरी केलेल्या मनोरंजन डीचा साई कृष्णा मित्र आहे. मनोरंजनने १३ डिसेंबर रोजी लोकसभेच्या सभागृहात प्रवेश केला होता आणि कॅनमधून पिवळा वायू सोडला होता. मनोरंजनसह चौघांविरोधात दहशतवादविरोधी कायदा, बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

साई कृष्णा आणि मनोरंजन बेंगळुरूच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात बॅचमेट होते. तो घरून काम करत होता आणि त्याला दिल्ली पोलिसांनी काल रात्री १० वाजता त्याच्या बागलकोट येथील घरातून ताब्यात घेतले. त्याला चौकशीसाठी दिल्लीत आणले आहे.

दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आणखी एका व्यक्तीचे नाव अतुल कुलश्रेष्ठ (५०) असे असून तो उत्तर प्रदेशातील जालौनचा आहे. अतुलला बच्चा म्हणूनही ओळखलं जातं. त्याच्याविरोधात पूर्वी कोणत्याही प्रकारची गुन्ह्यांची नोंद नाही. तसंच, त्याचा कोणाशी राजकीय संबंधही नाही. परंतु, तो विद्यार्थीदशेपासून शहीद भगतसिंग यांच्या विचारांनी प्रेरित होता.

तो फेसबुकवर संसदेतील घुसखोरांशी रेकॉर्ड चॅट करताना पकडला गेला. यामुळे दिल्ली पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. भगतसिंग फॅन्स क्लबशी जोडलेला अतुल विविध सभांचे आयोजन करायचा आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनातही सहभागी झाला होता.

माध्यम प्रतिनिधी अतुलच्या घरी पोहोचल्यावर कुटुंबीयांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अतुलला दोन मुले आणि एक मुलगी आहे. १३ डिसेंबर रोजी संसदेतील सुरक्षा भंग केल्याप्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये लोकसभेत घुसखोरी करणारे मनोरंजन आणि सागर शर्मा, संसदेबाहेर धुराचे कॅन वापरणारे अमोल शिंदे आणि नीलम आझाद यांचा समावेश आहे. ललित झा, सुरक्षा भंगाचा मास्टरमाईंड मानला जातो आणि महेश कुमावत, ज्यावर झा ला मदत केल्याचा आरोप आहे.

मणिपूर अशांतता, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संसदेत घुसखोरी केल्याचा दावा या आरोपींनी केला आहे. परंतु, पोलीस सर्व बाजूंनी तपास करणार आहेत.

Story img Loader