Bengaluru Volvo Accident CCTV Video : बंगळुरूजवळ झालेल्या एका भीषण अपघातात एका सॉफ्टवेअर कंपनीच्या सीईओसह एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली . बंगळुरू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ चंद्रम इप्पाळगोळ हे त्यांच्या व्होल्वो एक्ससी ९० एसयूव्हीने प्रवास करत होते. मात्र आचानक बंगळुरू शहराच्या बाहेर नेलमंगळा तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग ४८ वर त्यांच्या एसयूव्हीवर एक कंटेनर ट्रक उलटला, ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. आता ही दुर्घटना घटली तेव्हाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये अपघात घडला ते क्षण दिसून येत आहेत.
इप्पाळगोळ आणि त्यांचे कुटुंबिय महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी जात होते. बेंगळुरू-तुमाकुरू महामार्गावरील टिपागोंडानाहल्लीजवळ सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. कंटेनर ट्रक आधी एका दुधाच्या टँकरला धडकला ज्यामुळे तो उलटला. इप्पाळगोळ यांच्या समोरच हा अपघात घडल्याने त्यांनी आपल्या कारची गती कमी केली. पण कंटेनर त्यांच्या गाडीच्या छतावरच कोसळला, ज्यामुळे कारमधील सर्वजण त्याखाली चेंगरले गेले.
सहाजणांचा जीव घेणाऱ्या या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकच्या चालकाने सोमवारी याबद्दल माहिती दिली की, त्याच्या समोरील वाहन अचानक थांबल्याने त्याचे नियंत्रण सुटले. यामुळे पोलादाची वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या विरूद्ध बाजूला असलेल्या एसयूव्हीवर उलटला. ज्यामध्ये दबल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्या ट्रक ड्रायव्हरचे नाव आरिफ असे असून तो झारखंडचा रहिवासी आहे. त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की अपघात झाला तेव्हा त्याच्या ट्रकची स्पीड ही ४० किलोमीटर प्रति तास इतकी होती.
पोलिस उपअधीक्षकांच्या (डीवायएसपी) नेतृत्वाखाली या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. पोलीसांकडून अपघात स्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. या अपघातातील मृतांमध्ये चंद्रम इप्पाळगोळ, त्यांची पत्नी गौराबाई (४० वर्षे), त्यांची मुले ज्ञान (१६ वर्षे) आणि दीक्षा (१० वर्षे), त्यांची मेहुणी विजयालक्ष्मी (३५ वर्षे) आणि त्यांची भाची आर्या (६ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. चंद्रम इप्पाळगोळ हे मूळ सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोरबागी गावाचे रहिवासी होते. चंद्रम इप्पाळगोळ हे बंगळुरू येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत सीईओ होते. त्यांचे कुटुंब देखील त्यांच्याबरोबर बेंगळुरू येथे राहत होते.