करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर देशात अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आता तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका सांगण्यात आला आहे. त्यात बंगळुरूतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या दोन आठवड्यात बंगळुरूतील ५४३ मुलांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ही मुलं १ ते १९ वयोगटातील आहेत. यामुळे कर्नाटक सरकारनं तातडीचं बैठक बोलवली आहे. कर्नाटमध्ये काही दिवसांपूर्वी शाळा सुरु करण्याचे आदेश देण्यात आले होते. करोनाचा वाढता फैलाव पाहता पुन्हा एकदा कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

बंगळुरूत गेल्या ११ दिवसात ५४३ मुलांना करोनाची लागण झाल्याचं बृहन बंगळुरू महानरपालिकेनं सांगितलं आहे. यातील बहुतेक मुलांना करोनाची सौम्य लक्षणं आहेत. तर काही जणांमध्ये कोणतीच लक्षणं नाहीत. “कुठल्याही प्रकारे गंभीर लक्षणे असलेले लहान मुले रुग्णालयात दाखल झाली आहेत का? याची आम्ही तपासणी करत आहोत. मात्र, या तपासणीत सुद्धा आम्हाला सौम्य आणि अतिसौम्य लक्षणे असलेली लहान मुले आढळली आहेत ज्यांना घरात उपचार देता येईल.”, बीबीएमपीचे आरोग्यविभागातील विशेष आयुक्त रणदिप. डी. यांनी सांगितलं. बीबीएमपी कोव्हिड-19 वॉर रुमच्या आकडेवारीनुसार, ०-९ वयोगटातील ८८ मुले तर १० ते १९ वयोगटातील ३०५ मुलांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. करोनाच्या ४९९ चाचणी केल्यानंतर त्यापैकी २६३ हे मागील पाच दिवसापूर्वी आढळले होते. त्यामध्ये ९ वर्षांची ८८ मुलं आणि १० वर्षांवरील १७५ मुलांचा समावेश आहे.

“पालकांकडून करोना मुलांपर्यंत पसरला आहे किंवा मुलांमुळे पालकांना झालेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चाचणी केल्यानंतर, सौम्य लक्षणे असलेल्या मुलांचे प्रमाण जास्त आहे. लहान मुलांचा वावर दुसऱ्या लहान मुलांबरोबर जास्त असतो. त्याचबरोबर ते करोनाचे नियम पाळत नाही आणि लसीकरणही झालेले नसल्याने त्यांना धोका सर्वाधिक आहे.”, बाल संसर्गजन्य रोगच्या सल्लागार डॉ. अर्चना एम. यांनी इंडिया टूडेला ही माहिती दिली.

धक्कादायक! चार वर्षाच्या चिमुकल्यानं घरासमोर लघुशंका केल्यानं शेजाऱ्यानं केली मुलाच्या आईची हत्या

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी रुग्णसंख्या मात्र अद्यापही चिंताजनक आहे. देशात गेल्या २४ तासांत ४० हजार १२० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसंच ५८५ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ४२ हजार २९५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४० हजार १२० नवे रुग्ण आढळल्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २१ लाख १७ हजार ८२६ इतकी झाली आहे. दरम्यान देशात उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी १३ लाख २ हजार ३४५ वर पोहोचली आहे. देशात सध्या ३ लाख ८५ हजार २२७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान देशात करोनामुळे आतापर्यंत ४ लाख ३० हजार २५४ जणांचा मृत्यू झाला आहे.