Benjamin Netanyahu House Targeted With Bomb: गेल्या वर्षभरापासून पश्चिम आशियामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या घराला बॉम्बने लक्ष्य करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर इस्रायलच्या सीझेरिया शहरात नेतन्याहू यांच्या घराच्या दिशेने दोन फ्लॅश बॉम्ब टाकण्यात आले. पण सुदैवाने हे बॉम्ब घराबाहेरील बागेत पडल्याने जीवीत हानी टळली.
नेतान्याहू यांच्या घराबाहेर नेमकं काय घडलं?
सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सीझेरिया शहरात नेतान्याहू यांच्या निवासस्थानाजवळ दोन बॉम्ब टाकण्यात आले. पोलीस आणि अंतर्गत सुरक्षा यंत्रणेच्या संयुक्त निवेदनात सांगण्यात आले की, “पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील बागेत दोन बॉम्ब पडले. घटनेच्या वेळी पंतप्रधान आणि त्यांचे कुटुंबीय घरी नव्हते. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.”
महिन्याभरात दुसऱ्यांदा लक्ष्य
दरम्यान गेल्या महिनाभराच्या काळात नेतान्याहू यांच्या घराला लक्ष्य करण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १९ ऑक्टोबरलाही नेतान्याहू यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले होते. तेव्हा ड्रोनच्या माध्यमातून त्यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या हल्ल्याची जबाबदारी इराणचा पाठिंबा असलेल्या हेजबोलाह संघटनेने घेतली होती. त्यावेळी नेतान्याहू यांनी, हेजबोलाहने त्यांची व पत्नीची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे २३ सप्टेंबरनंतर इस्रायलने लेबनॉनमधील हेजबोलाहच्या ठिकाणांवरील हल्ल्यांचा वेग वाढवला आहे.
हे ही वाचा: डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका, २७ वर्षीय तरुणी होणार व्हाईट हॉऊसची प्रेस सेक्रेटरी; कोण आहेत कॅरोलिन लेविट?
या घटनेनंतर इस्रायलचे राष्ट्रपती आयझॉक हर्झोग यांनी निषेध नोंदवला आहे. तर संरक्षण मंत्री इस्रायल कॅटझ यांनी सांगितले की, शत्रूंनी आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांनी या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांना कठोर पाऊले उचलण्याचे आदेश दिले आहेत.
इस्रायलच्या हल्ल्यात १० पॅलेस्टिनी ठार
शनिवारी, गाझा शहरातील शाती निर्वासित छावणीतील शाळेवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात १० पॅलेस्टिनी ठार तर २० जण जखमी झाले आहेत. या निर्वासित शिबिरात लोकांवर उपचार केले जात असून सध्या ते विस्थापित कुटुंबांना आश्रय देत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, यूएन संचालित अबू अस्सी शाळेत अजूनही लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, जिथे बचाव कार्य चालू आहे. इस्रायली अधिकाऱ्यांकडून तूर्तास कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.