आयपीएलसंघ राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा क्रिकेट सामन्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर सट्टेबाजी करत होता व त्याला सट्टेबाजी करण्याची सवय पडली असल्याचा दावा कुंद्राचा व्यावसायिक भागिदार उमेश गोयंका याने केला आहे. उमेशने ही माहिती पोलिसांना दिल्याचे म्हटले जात आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने आयपीएल सामन्यांवरील सट्टेबाजी आणि फिक्सिंग संदर्भात तपास करताना कुंद्राचा व्यावसायिक भागिदार गोयंकाकडे चौकशी केली असता ही बाब समोर आली. कुंद्राची अभिनेत्री पत्नी शिल्पा शेट्टीला त्याच्या सट्टेबाजीच्या सवयी बद्दल चांगली माहिती असल्याचा गोयंकाने दावा केला असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
शिल्पाने तिच्यासाठी आपल्याला सट्टा लावण्यास सांगितल्याचा आरोप गोयंकाने केला असल्याचा दावा दिल्ली पोलिस आयुक्त निरज कुमार यांनी केला.
कुंद्राने राजस्थान रॉयल्सचा खेळाडू सिध्दार्थ त्रिवेदीशी आपली ओळख करून दिली. त्रिवेदी अनेक बुकिंच्या संपर्कात होता व त्यांच्याकडून महागड्या भेटवस्तू घेत होता. त्याला स्पॉट फिक्सिंगसाठी विचारणा करण्यात आली होती, पण तो त्यांच्या गळाला लागला नाही. असे गोयंकाने पोलिस तपासात सांगितले. त्रिवेदी या खटल्यातील साक्षीदार आहे.

Story img Loader