हायपरलूप आणि चालकविरहित उडणाऱ्या कारनंतर संयुक्त अरब अमिरात (यूएई) आता आणखी एका महत्वकांक्षी प्रकल्पाचा विचार करत आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प भारताशी निगडीत आहे. नजीकच्या काळात दुबई आणि मुंबईदरम्यान समुद्रातील पाण्याखालून रेल्वे धावू शकते.
‘खलीज टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, अबुधाबी येथे यूएई-भारत कॉनक्लेव दरम्यान नॅशनल अॅडव्हायजर ब्यूरो लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य सल्लागार अब्दुल्ला अलशेही यांनी याचा खुलासा केला आहे. अलशेही कन्सल्टंट कंपनी नॅशनल अॅडव्हायजर ब्यूरो लि.ची संस्थापक आहे. त्यांनी म्हटले की, पाण्याखालील रेल्वेच्या जाळ्याचा फायदा यूएई-भारताशिवाय दुसऱ्या देशांनाही फायदा होईल. प्रवाशांशिवाय इंधन आणि इतर साहित्यांच्या आयात-निर्यातीसाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
सध्या याबाबत फक्त विचार सुरु आहे. मुंबई शहराला पाण्याखालून रेल्वे सेवेने जोडण्याची आमची इच्छा आहे. यामुळे द्विपक्षीय व्यवसायाला चालनाही मिळेल. भारताला तेल निर्यात करता येईल त्याचबरोबर नर्मदा नदीतून अतिरिक्त पाणी आयात केली जाईल, असे ते म्हणाले.
या योजनेवर विविध दृष्टीकोनातून विचार करण्याची गरज आहे. या प्रकल्पासाठी अभ्यास केला जाईल. जर हे वास्तवात आणता आले तर पाण्याखालून सुमारे २००० किमीच रेल्वे जाळे उभारले जाईल. जगात सध्या अशा पद्धतीचे अनेक प्रकल्प पाइपलाइनमधून कार्यान्वित आहेत. चीन, रशिया, कॅनाडा आणि अमेरिका देश यावर विचार करत आहेत. भारतात मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पावर काम सुरु आहे. यात समुद्राखालूनही बुलेट ट्रेन जाणार आहे.