राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे उद्या त्यांच्या सासरी म्हणजे भद्रबिला गावी जात आहेत. चित्रा नदीवरील हे छोटे गाव अगोदरच नोबेल विजेते कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितांमधील उल्लेखामुळे अजरामर झालेले आहे. प्रणव मुखर्जी हे बऱ्याच काळाने सासुरवाडीला भेट देत असल्याने गावाला उत्सवाचे स्वरूप आले आहे.
मुखर्जी यांच्या पत्नी शुभ्रा याही आपल्या माहेरगावी पतीसोबत येत असून आपल्या वडिलोपार्जित घरी त्या अनेक वर्षांनी भेट देतील. या भेटीमुळे भद्रबिलाला नवे रूपडे लाभले असून जिल्हा प्रशासनाने आठ कि.मी.चा रस्ता नवीन तयार केला आहे. भद्रबिला येथील रहिवासी असलेले काझी रकीब हे गावप्रमुख आहेत. प्रणबदा येत आहेत हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. त्यांचे आम्ही प्रेमाने स्वागत करणार आहोत, असे ते म्हणाले. नारैलचे उपायुक्त महंमद झोहिरूल हक यांनी सांगितले की, मुखर्जी तासभर पत्नीच्या माहेरी राहणार आहेत. नंतर ते शिलैदहा येथे टागोरांच्या कुथीबाडीला भेट देण्यासाठी कुष्टिया जिल्ह्य़ात जाणार आहेत.
शुभ्रा या दिवंगत अमरेंद्र घोष व मीराराणी घोष यांच्या कन्या असून चार भाऊ व चार बहिणी यांच्यात सर्वात ज्येष्ठ आहेत, शुभ्रा यांचे कुटुंबीय त्यांचे बंधू कनाईलाल घोष वगळता १९५२ मध्ये भारतात आले. बांगलादेश मुक्ती युद्धात १९७१ मध्ये पाकिस्तानी लष्कराने त्यांच्या या वडिलोपार्जित घराची मोडतोड केली होती. त्यानंर कनाईलाल घोष यांनी हे घर परत बांधले होते. प्रणव मुखर्जी यांनी सांगितले की, आपली पत्नी शुभ्रा व कन्या शर्मिष्ठा १९९५ मध्ये भद्रीबिला येथे गेल्या होत्या पण त्यावेळी आपण त्यांच्यासमवेत नव्हतो. बांगलादेश दौरा हा घरी आल्याचा आनंद देणारा आहे. राष्ट्रपती म्हणून पहिल्या परदेश दौऱ्यासाठी आपण बांगलादेशची निवड केली ती सहेतुक व या प्रेमातूनच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा