महाराष्ट्राचे माजी राज्यपाल हे आता उद्धव ठाकरे, महाराष्ट्रातलं राजकारण, पहाटेचा शपथविधी याबाबत भरभरून बोलताना दिसत आहेत. न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तर त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत एक वक्तव्य केलं जे चांगलंच चर्चेत आहे. ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल असणाऱ्या भगतसिंह कोश्यारींना विमानातून उतरवण्यात आलं होतं. या गोष्टीची आठवण करून देत आपल्या खास शैलीत भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे भगतसिंह कोश्यारींनी?

“उद्धव ठाकरे हे संत माणूस आहेत. ते कुठे राजकारणात आले? त्यांनी त्यांची संघटना व्यवस्थितपणे चालवायला हवी होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसण्याच्या लायकीची व्यक्ती नव्हती तरीही त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. शरद पवारांसारखा मार्गदर्शकही उद्धव ठाकरेंना वाचवू शकला नाही. मी महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी मला विमानातून उतरवलं होतं. आता नियतीने त्यांना खुर्चीवरून काली उतरवलं आहे.” अशी खोचक टीका माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केली.

उद्धव ठाकरेंना बळीचा बकरा करण्यात आलं

उद्धव ठाकरेंना बळीचा बकरा करण्यात आलं. मी देवापुढे प्रार्थना करतो आहे की त्यांनी या सगळ्यापासून लांब रहावं. उद्धव ठाकरेंना बळेबळेच मुख्यमंत्री केलं गेलं. उद्धव ठाकरेंनी मला विमानातून उतरवलं. मात्र नियतीने तुम्हाला मुख्यमंत्रीपदावरून, त्या खुर्चीवरूनच खाली खेचलं. मी त्यांना सत्तेतून खाली खेचलं नाही, पण नियतीने जे करायचं ते केलं असं कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

फेब्रुवारी २०२१ मध्ये काय घडलं होतं?

भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांना मसुरी या ठिकाणी आयएएस अॅकॅडमीत होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जायचं होतं. प्रोटोकॉलनुसार त्यांना सरकारी विमानाने जायचं होतं. मात्र राज्य सरकारकडून संमती न मिळाल्याने भगतसिंह कोश्यारी यांना विमानातून उतरावं लागलं होतं. या घटनेनंतर त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagat singh koshyari slams uddhav thackeray after resigning from maharashtra governor scj